पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनी हाइस्ट..गोष्ट एका फ्लॉप सुपरडूपर हिट सीरिजची

मनी हाइस्ट

असं म्हणतात ज्यांच्या हातात गमावायला काहीच नसतं अशी लोक मोठ्यातली मोठी रिस्क घ्यायलाही कचरत नाहीत. वरचा फोटो पाहून मी नेमकं कशाबद्दल बोलतेय हे वाचकांच्या लक्षात आलं असेलच. ‘मनी हाइस्ट’ ही सीरिज आजच्या घडीला नेटफ्लिक्सवरची भारतातच नाही तर जगभरात पाहिली गेलेली नंबर वन सीरिज ठरली आहे. आता मी हे लिहिपर्यंत तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी ही सीरिज पाहिलीही असेल. त्यामुळे याबद्दल वेगळं असं काहीच सांगायला नको. आज ज्यांनी ज्यांनी ही सीरिज पाहिली आहे त्यांच्यासाठी या हाइस्टचा मास्टरमाईंड ‘प्रोफेसर’, लाल जम्पसूट, सल्व्हादोर दालीचा मास्क, ‘बेला चाऊ’ हे गाणं कुतूहलचा विषय ठरलं असेल.

२०१७ साली आलेल्या स्पॅनिश ‘मनी हाइस्ट’चा पहिला सीझन स्पेनमध्ये लोकप्रिय ठरला. मात्र दुसऱ्या सीझननंतर ‘मनी हाइस्ट’ची लोकप्रियता तितक्याच वेगानं कोसळली. ‘मनी हाइस्ट’चे सर्व कलाकार अक्षरश: रडू लागले. सारं  संपलंय की काय असं वाटून प्रत्येकानं प्रयत्न सोडून दिले.  मात्र आकाशातून जादुई शक्ती खाली यावी आणि तिनं जादूची कांडी फिरवावी असंच काहीसं ‘मनी हाइस्ट’बाबतही झालं. या शोचे हक्क नेटफ्लिक्सनं घेतले. नेटफ्लिक्सनं विविध भाषेत हा शो भाषांतरित केला. नेटफ्लिक्सच्या इंटरनॅशनल कॅटलॉगमध्ये हा शो आला, म्हणजे जगाच्या पाठीवर नेटफ्लिक्स वापरणारा कोणताही व्यक्ती हा शो पाहू शकत होता. आजच्या घडीला या स्पॅनिश शोची लोकप्रियता चक्रावून टाकेन इतक्या उच्च पातळीला पोहोचली आहे, तीन वर्षांपूर्वी शो फ्लॉप गेलाय आणि आपण सर्व काही गमावलं म्हणून या शोमधले स्पॅनिश कलाकार, दिग्दर्शक, लेखक ढसाढसा रडले होते हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.

‘मनी हाइस्ट’च्या पहिल्या दोन सीझनची कथा ही ‘द रॉयल मिंट ऑफ स्पेन’ मधील पैशांच्या चोरीभोवती फिरते. या चोरीचा सूत्रधार असतो तो ‘प्रोफेसर’. अफाट बुद्धिचातुर्य असलेला व्यक्ती, अत्यंत हुशार, अभ्यासू आणि ‘क्रिस्टल क्लिअर’ व्यक्तिमत्त्व. ‘क्रिस्टल क्लिअर’ यासाठी कारण या प्रोफेसरची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आपल्या मृत वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तो ‘द रॉयल मिंट ऑफ स्पेन’ लुटण्याचा कट आखतो. म्हणजे जिथे नोटांची छपाई होते. यासाठी प्रोफेसर अशा व्यक्तींची निवड करतो ज्यांच्याकडे आयुष्यात गमावण्यासाठी काहीही नाही. प्रोफेसर आठ व्यक्तींची निवड करतो या आठमध्ये प्रत्येकाचं एक वैशिष्ठ्य असते. कोणाकडे ताकद, कोणाकडे बुद्धी तर कोणाकडे उत्तम नेतृत्त्वगुण, पण प्रत्येकात एक दुवा समान असतो तो म्हणजे हे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असतात.

प्रोफेसर या सर्वांना त्याच्या ‘शाळेत’ घेऊन येतो, अन् अख्खा प्लॅन समजावून सांगतो. या शाळेचा एक नियम असतो इथे कोणीही नाती जोडायची नाही, कोणीही आपली खरी ओळख एकमेकांना सांगायची नाही त्यामुळे कोणालाही एकमेकांची नाव माहिती नसतात, त्यामुळे ते एकमेकांना शहराच्या नावानं हाक मारतात. टोकियो, नैरोबी, रिओ, डेन्वर, बर्लिन, मॉको, हेलसिंकी, ऑस्लो अशी नावं ते निवडतात. यात टोकियो आणि नैरोबी या दोन मुली तर बाकी सारी पुरुष मंडळी. रॉयल मिंट ऑफ स्पेनमध्ये जाण्यापासून ते तिथून बाहेर येणाऱ्यापर्यंत सगळा प्लॅन हा प्रोफेसरचा. सगळ्यांनी केवळ प्रोफेसरच्या डोक्यानं वागायचं बस्स हा दुसरा महत्त्वाचा नियम.

वरकरणी हे आठजण फारफारतर रॉयल मिंटमध्ये शिरुन ‘धूम’ स्टाइल चोरी करतील आणि बाहेर येतील असं प्रेक्षकांना वाटतं. मात्र जिथे आपली विचार करण्याची, तर्कवितर्क मांडण्याची क्षमता संपते तिथून या प्रोफेसरची विचार करण्याची क्षमता सुरु होते. अगदी सूक्ष्म शक्यतांचा विचार करुन त्यानं चोरीचा प्लॅन आखलेला असतो. त्यामुळे ही चोरी आपल्या कल्पनेपलीकडची आणि चक्रावून टाकणारी आहे.

हे हाइस्ट पैसे लुटण्यासाठी नाही तर पैसे छापण्यासाठी मिंटमध्ये शिरतात हे बऱ्याच वेळानं प्रेक्षकांच्या लक्षात येतं. मिंटच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. पैसे छापण्याची मशीनच हाती लागल्यावर हवा तेवढा पैसा छापायचा हा त्यांचा मुख्य उद्देश. पण अब्जावधी पैसे छापणार कोण? तर इथेही प्रोफेसरचं डोकं कमाल धावतं. या मुद्रितखान्यात पैसे छापणारे द रॉयल मिंट ऑफ स्पेनमधले तज्ञ्ज व्यक्ती असतात. या सर्वांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून पैसे छापण्याचं काम हे आठही जण करु लागतात. प्रत्येकाला शिफ्ट लावली जाते.

पण गंमत म्हणजे चोरी करताना एकाचाही खून करायचा नाही, ओलीस ठेवलेल्या एकाही व्यक्तीला त्रास द्यायचा हा त्यांचा तिसरा महत्त्वाचा नियम असतो. त्यामुळे ओलीस ठेवलेल्या प्रत्येकाची जेवणापासून ते औषध पाण्यापासून सगळी सोय हे लुटारुच करतात. आता तुम्ही म्हणाल, आठ चोर आणि एक प्रोफेसर आत बसून पैसे छापत असताना देशातले पोलिस नेमकं करत काय असतात? मात्र ही मज्जा सांगण्यात नाही ती ही सीरिज पाहण्यात आहे. अफाट शक्ती विरुद्ध बुद्धी असा तुफान सामना या सीरिजमध्ये दाखवला आहे. त्यामुळे मिनिटामिनिटांला प्रेक्षकांनाच्या वाट्याला ‘आश्चर्याचे धक्के’ येतात.

'मनी हाइस्ट'मधला दालीचा मास्क आणि लाल जम्पसूट हा सध्या जगभरात एक सिम्बल ठरला आहे. फोटोग्राफर आणि आर्ट डायरेक्टर यांच्या कल्पेनेतून हा आयकॉनिक गेटअप तयार झाला आहे. लाल हा रंग पॅशन, पॉवर, भीती, युद्ध, रक्त, ताकद यांचा प्रतीक आहे त्यामुळे मनी हाइस्टमध्ये लाल रंगांच्या कपड्याला प्राधान्य दिलंय. हे हाइस्ट उठून दिसावं म्हणून पूर्ण सेट हा काळा, करडा अशा छटांमध्ये रंगवलाय.

'मनी हाइस्ट' ची कथा शब्दांत मांडणं शक्य नाही कारण यात असंख्य पैलू आहेत, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याचा नवा सीझन लाँच झाला. पहिल्या दोन सीझनपेक्षाही सगळंच काही लार्जर दॅन लाइफ तिसऱ्या आणि चौथ्या सीझनमध्ये आहे. रॉयल मिंट ऑफ स्पेनमध्ये अब्जावधी पैसे छापून फरार झालेले हे सर्वजण आता द बँक ऑफ स्पेन लुटायला येतात. या बँकेतलं सर्व सोनं वितळून त्याचे बारीक दाणे करायचे आणि हे दाणे बँकेतून बाहेर न्यायचे हा प्लॅन.  मात्र हा प्लॅन ते का आखतात याचीही ही कथा आहे. या कथेत मला जायचं नाही, मात्र हे सीझन शूट करताना काही आव्हानात्मक गोष्टी घडल्या याचा उल्लेख मला नक्कीच करावासा वाटेल.

हे लुटारू द बँक ऑफ स्पेनमध्ये शिरण्याआधी स्पेनमध्ये मोठे एअर बलून घोंगावतात. या बलूनमधून माद्रिद शहरात अक्षरश: पैशांचा पाऊस पडतो. लोक हे पैसे घेण्यासाठी वेडे होतात. रस्त्यावर साराच गोंधळ. चक्रावून टाकणारा हा सीन मात्र तो चित्रीत करेपर्यंत दिग्दर्शकांच्या डोळ्यात मात्र पावसाच्या धारांप्रमाणे अश्रूंच्या धारा वाहत होत्या. याला कारणही तसंच होतं. हा सीन चित्रीत करण्यासाठी माद्रिदच्या चौकात खोटे पैसे उडवले जात होते, मात्र काही कारणानं पैसे हवेत उडत नव्हते. हे पैसे एका मोठ्या फॅनच्या साहाय्यानं उडवले जात होते, मात्र है पैसे हवेत उडण्याऐवजी ते मोठ्या पंख्याच्या पात्यात जाऊन अडकत होते. क्रू मेंबरनं कशीबशी ही समस्या सोडवली मात्र अचानक शहरात पावसाला सुरुवात झाली. चित्रीकरणासाठी आणलेल्या कागदाच्या साऱ्या नोटा पावसात भिजून खराब झाल्या. चौकातल्या रस्त्यांवर कागदाचे लगदे चिकटले होते. हे लगदे साफ करेपर्यंत सगळ्यांच्या नाकी नऊ आले.

पाऊस थांबला ऊन पडलं. दिग्दर्शकापासून ते फोटोग्राफरपर्यंत सारेच रस्ता सुकवून त्यातला कागदाचा लगदा साफ करण्याच्या कामाला लागले मात्र खरी गोची पुढे झाली. हे दृश्य ढगाळ वातावरणात चित्रीत झालं मात्र पावसानंतर लख्ख सूर्यप्रकाश पडला, त्यामुळे निराशेपलीकडे काहीही हाती आलं नाही, मात्र त्यानंतर सर्वांनी त्याच उत्साहानं पुन्हा एकदा हा शॉट चित्रीत केला. मनी हाइस्टमधल्या काही बेस्ट दृश्यांपैकी हे एक दृश्य आहे.

दुसरं म्हणजे बँक ऑफ स्पेनमधलं सोन्याच्या विटा चोरतानाचं दृश्य. कोणी चोरानं बँक ऑफ स्पेनमधलं सोनं  चोरण्याचा प्रयत्न केला तर सोन्याच्या चेंबरचे सर्व दरवाजे बंद होऊन तिथे वेगानं पाणी येऊन चेंबर पाण्यानं पूर्ण भरून जातो असं हे दृश्य आहे. पाण्यात बुडालेला चेंबर चित्रीत करण्यासाठी अमेरिकेत सेट तयार करण्यात आला. आधी सेट तयार करण्यात आला मग हा सेट पूर्णपणे पाण्यात बुडवण्यात आला. गम्मत म्हणजे पाण्याचा दबाव इतका होता की चेंबरमध्ये दाखवलेल्या खोट्या सोन्याच्या विटा या पाण्यात तंरगू लागल्या. चित्रीकरणासाठी वेळ कमी होता त्यामुळे काय करावं याचं टेन्शन. अचानक सर्वांना कल्पना सुचली ड्रील मशीनच्या साहाय्यानं या कृत्रिम सोन्याच्या विटा स्टँडवर फिक्स करून टाकल्या. आता प्रश्न मिटला असं वाटलं असताना दुसरीच समस्या तयार झाली. या विटांच्या आत फायबर स्पंज असल्यानं आणि दीर्घ काळ या विटा पाण्यात राहिल्यानं त्या आकुंचन पावल्या. आता सीझन ३ आणि ४ मध्ये ज्या सोन्याच्या विटा पाण्यात  दिसत आहेत ती फक्त व्हिडिओ एडिटरच्या मेहनतीची कमाल आहे.

आता 'मनी हाइस्ट'च सीझन ४ हा एका निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे त्यामुळे जगभरातले चाहते पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहेत, हा भाग येईल तेव्हा येईल. मात्र जो शो एकेकाळी फ्लॉप गेला तो आजच्या घडीला प्रेक्षकांमध्ये इतका लोकप्रिय ठरेल याची कल्पना कोणीही केली नसेल हे नक्की!