'बधाई हो' या चित्रपटापासून सर्वाधिक चर्चेत आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. नीना अनेकदा फॅशनेबल कपड्यांमध्ये आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात. त्यांचा हा प्रयत्न अधिक तरुण भूमिका मिळवण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न अनेकदा त्यांना विचारला जातो.
मात्र, ' तरुणींच्या भूमिका मिळाव्या यासाठी मी फॅशनेबल कपडे परिधान करत नाही. मी फॅशनप्रेमी आहे आणि मला फॅशनबाबत अनेक प्रयोग करुन पाहायला आवडतं. माझ्या हॉट फोटोंवर प्रेक्षकांच्या जास्त प्रतिक्रिया येतात. पण मी जर एखादा साधा फोटो अपलोड केला तर त्याला फार लाईक्सही येत नाही.' असं त्या म्हणाल्या. 'मला क्वचितच नकारात्मक प्रतिक्रिया येतात. लोक सोशल मीडियावर माझं कौतुक करतात ही गोष्ट मला जास्त आवडते', अशी प्रतिक्रिया त्यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली.
२०१८ मध्ये नीना या 'बधाई हो', 'विरे दि वेडिंग' आणि 'मुल्ख' या चित्रपटात दिसल्या होत्या. तर येत्या काही महिन्यात त्या 'पंगा', 'सुर्यवंशी', 'म्युझिक टीचर', 'ग्वाल्हेर' यांसारख्या चित्रपटातही दिसणार आहेत. नीना यांचं या वर्षातलं वेळापत्रक हे व्यग्र आहे मात्र वयामुळे मला चांगल्या संधी गमवायच्या नव्हत्या असं त्या म्हणाल्या.