नेटफ्लिक्सवरच्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. 'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है' म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेची चर्चा तर सोशल मीडियावर खूपच रंगली. हा गणेश गायतोंडे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं साकारला होता. आता 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सिझनच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. मात्र दुसरा सिझन प्रदर्शित होण्यापूर्वी नवाजच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर नेटफ्लिक्सनं दिली आहे.
नेटफ्लिक्सनं आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाज मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिरीयस मॅन’ असणार आहे. हा चित्रपट मनु जोसेफ यांच्या पुस्तकावर आधारित आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधिर मिश्रा करणार आहेत. 'गणेश गायतोंडेला जे प्रेम मिळालं तेच प्रेम सीरिअस मेनमधल्या अय्यन मणीच्या वाट्याला येईल अशी मी आशा करतो. पण सध्या मी सेक्रेड गेम्सची वाट पाहत आहे, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी आतुर आहे,' असं नवाज म्हणाला.
‘सिरीयस मॅन’ झोपडपट्टीत राहणाऱ्या एका धुर्त आणि लबाड माणसाची गोष्ट आहे. आपला १० वर्षांचा मुलगा हा अफाट बुद्धीमत्ता असलेला हुशार व्यक्ती असल्याचं तो जगाला सांगतो. यावर संपूर्ण जगाला तो विश्वास ठेवायला भाग पाडतो मात्र या खेळाचा खरा बळी त्याचा मुलगाच ठरतो असं कथानक ‘सिरीयस मॅन’चं आहे.