पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय कुमारचा महिन्याचा खर्च फक्त .....

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला आघाडीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. अॅक्शन, रोमॅन्स, कॉमेडी, सोशल अशा अनेक प्रकारच्या चित्रपटात अक्षयनं काम केलं आहे. सुरुवातीला 'अॅक्शन हिरो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयनं आपली ही ओळख पुसून नवी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली. आज अनेक सामाजिक विषय आपल्या चित्रपटातून हाताळणारा अभिनेता म्हणूनही अक्षयकडे पाहिलं जातं. 'पॅडमॅन', 'रुस्तम', 'टॉयलेट एक प्रेमकथा',  'एअरलिफ्ट', 'केसरी' अशा वेगवेगळ्या चित्रपटांतून अक्षयनं आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो मात्र असं असलं तरी माझा महिन्याचा खर्च हा केवळ तीन हजार रुपयेच आहे असं अक्षयनं 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

'जर मी कमावलेले पैसे हे कोण्या दुसऱ्यासाठी उपयोगी पडत असतील तरच  पैसे ही चांगली गोष्ट असल्याचं मी मानेन. सध्या गरजवंतांना मदत करण्याबरोबरच मी शाळा देखील चालवत आहे. महिन्याला किती पैसे मी खर्च करतो असं मला तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की माझा मासिक खर्च हा तीन हजारांहून अधिक नसतो. ' असं अक्षय म्हणाला.

२०१८ मध्ये 'फोर्ब्स' मासिकानं जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली होती. यात अक्षय कुमार सातव्या स्थानी होता. त्याचं एकूण उत्पन्न हे २७६ कोटी इतकं  होतं. मात्र तरीही आपण साध्या राहणीमानाला पसंती देतो, असं अक्षय म्हणाला. आरोग्याविषयी  जागरूकता निर्माण करण्यात अक्षय अग्रस्थानी आहे. पहाटे लवकर उठून धावणे, व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे, उशीरा काम करण्यापेक्षा लवकर काम आटपून झोपी जाणे असा अक्षयचा  वर्षांनुवर्षे चालत आलेला दिनक्रम आहे. मद्यपानापासून चार हात लांबच राहणाऱ्या अक्षयच्या आरोग्याप्रती असलेल्या जागरुकतेचं अनेक अभिनेत्यांनी कौतुकही केलं आहे.

यावर्षी बॉलिवूडमध्ये  अक्षयनं २८ वर्षे पूर्ण केली. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला त्याकाळी ५० हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं. त्यानंतरच्या काळात हे मानधन वाढून ३ ते ५ लाख इतकं झालं. मात्र २००० पासून चक्र वेगानं बदलली. २००० नंतर जे चित्रपट आलेत तेव्हा मानधनात वाढ झाली चित्रपटाबरोबरच जाहिराती, डिजिटल हक्क यांसारख्या मार्गानं कमाईत वाढ झाली असंही अक्षय म्हणाला. एकीकडे प्रचंड पैसे कमावणाऱ्या सेलिब्रिटींचा मासिक खर्च हा कित्येक कोटींच्या घरात  असतो, मात्र अक्षय साध्या राहणीमानालाच पसंती देतो.