पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बींसोबत काम करण्याचं सुबोध भावेचं स्वप्न पूर्ण

सुबोध भावे अमिताभ बच्चन

अमिताभ  बच्चन  हे  बॉलिवूडचे 'शहेनशहा' आहेत. त्यांच्यासोबत काम करावं  ही इच्छा अगदी नवोदीत कलाकारांपासून ते बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपर्यंत सर्वांचीच आहे. मात्र बिग बींसोबत काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही.  मराठीतला आघाडीचा कलाकार  सुबोध भावेला ही संधी मिळाली. सुबोधनं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं असं म्हणत या अविस्मरणीय क्षणाचा फोटो  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर  शेअर केला आहे. 

'निर्विवादपणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं. AB आणि CD या चित्रपटाच्या निमित्तानं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं',  असं म्हणत सुबोधनं आठवणीत ठेवण्याजोग्या क्षणाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. AB आणि CD या चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन हे तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटात झळकणार आहेत. 

मिलिंद लेले दिग्दर्शित या चित्रपटात विक्रम  गोखले हे प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ  हे विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिका  दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण  सुरू असून  सलग ५ दिवसांसाठी बिग बी चित्रीकरण करणार आहेत. विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज  'अग्निपथ'नंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.