पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवणं हा योग्यच निर्णय'

ओंकार शेट्टी

देशभरातून मुंबईत आलेली अनेक कलाकार मंडळी ही बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत करिअर घडवू पाहतात. मात्र ओंकार शेट्टी या अमराठी दिग्दर्शकानं  एका मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं.  मराठी चित्रपटातून दिग्दर्शन  क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा माझा निर्णय हा योग्यच होता असं ओंकार अभिमानानं सांगतो. मराठी रसिक प्रेक्षक हा सजग आहे, त्याला जाण आहे, तो हुशार आहे असं ओंकार म्हणतो.

२०१८ साली आलेल्या 'आरॉन' या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यानं केलं. 'आरॉन' हा मराठी चित्रपट वेगवेगळ्या देशात चित्रीत करण्यात आला. अभिनेता शशांत केतकर  या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पहायला  मिळाला. शशांकबरोबर पहिल्यांदाच अनेक देशांतले  विविध कलाकार या  चित्रपटात पहायला मिळाले. विविध देशांत चित्रीत करण्यात आलेला आणि विविध देशांतील कलाकार असलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.  आपण याच मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले याचा मला अभिमान वाटतो असं ओंकार हिंदूस्थान टाईम्सशी साधलेल्या संवादात म्हणाला. 

'माझ्या कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीत नाही किंवा या क्षेत्रात माझा कोणी गॉडफादरही नाही. मी शून्यापासून धडपड करत सुरूवात केली. मराठी चित्रपट आपण का करू नये हा प्रश्न मला पडला. मराठी  प्रेक्षक सजग आहे, हुशार आहेत, समजूतदार आहेत त्यांना कलेची योग्य समज आहे.'  असंही ओंकार म्हणाला. 

'माझ्याजवळ हिंदीसाठी एक कथा आहे मात्र नवख्या दिग्दर्शकासाठी  पैसे  द्यायला कोणीही निर्माते तयार नाही' अशीही खंत ओंकारनं बोलून दाखवली. दिग्दर्शनात पाऊल ठेवण्याआधी ओंकारनं अनेक मालिका आणि चित्रपटासाठी एडिटर म्हणूनही काम पाहिलं आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान सोबत त्यानं काम केलं आहे. ओंकारचं दिग्दर्शन लाभलेल्या 'आरॉन' या चित्रपटाची निवड जागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.