पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Angrezi Medium : करिना कपूर पोलिसाच्या भूमिकेत!

करिना कपूर खान

'वीरे दी वेडिंग'नंतर आता करिना कपूर 'अंग्रेजी मीडियम'मध्ये झळकणार  आहे. गेल्या काही दिवसांपासून करिना 'हिंदी मीडियम'चा सीक्वल असलेल्या 'अंग्रजी मीडियम'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसेन अशा चर्चा होत्या. आता करिनाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. करिना या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'हिंदी मीडियम' हा चित्रपट खूपच गाजला होता. आपल्या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी दिल्लीतील सधन जोडपं चुकीचा मार्ग अवलंबतं. खोटं बोलून, लबाडी करून हे जोडपं आपल्या मुलीसाठी शाळेत प्रवेश मिळवण्यात यशस्वी होतात. मात्र लबाडीमुळे एका गरीब मुलाचा शिक्षणाचा हक्क आपण डावलला हे जोडप्याच्या लक्षात येतं. आत्ताची शिक्षण पद्धती, इथला भष्ट्राचार, सरकारी शाळांकडे फिरवलेली पाठ, इंग्रजीचा आग्रह, मातृभाषेचा न्यूनगंड असे अनेक विषय 'हिंदी मिडियम'मध्ये मांडले आहेत.  त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच खूप आवडला. इतकंच नाही तर चीनमध्येही भरभरून यश चित्रपटाला मिळालं. त्यामुळे चित्रपटाच्या सीक्वलची घोषणाही करण्यात आली. मात्र मुख्य अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन कर्करोगाचं निदान झालं. तो लंडनमध्ये या आजारावर उपचार घेत होता त्यामुळे सीक्वलचं चित्रीकरण लांबणीवर गेलं.

आता काही दिवसांपूर्वीच 'हिंदी मीडियम'च्या सीक्वलला सुरूवात झाली असून राजस्थानमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. इरफानसोबत राधिका मदनही प्रमुख भूमिकेत आहेत. तर करिना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच करिना अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अडजानिया करणार असून निर्मिती दिनेश विजन करणार आहेत.