'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है' म्हणणारा गणेश गायतोंडे कधी परत येतोय हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. २६ दिवसांत मुंबईत काहीतरी अघटित घडणार असं सांगून आत्महत्या केलेल्या या वेबसीरिजच्या खलनायकानं सांगितलेलं रहस्य उलगडण्यास पोलिस ऑफिसर सरताजला यश येणार का? याचं कुतूहल चाहत्यांना आहे. 'सब मरेंगे सिर्फ त्रिवेदी बचेगा' असं प्रत्येक खलनायकाच्या तोंडी असलेलं हे वाक्य आणि हा त्रिवेदी आहे तरी कोण यावरून पडदा उठण्याची चाहते वाट बघत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहते 'सेक्रेड गेम्स' च्या दुसऱ्या सीझनसाठी उत्सुक आहेत मात्र अद्यापही ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आता नेटफ्लिक्सनं या सीरिजसंदर्भातील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इस खेल का असली बाप कौन? असं लिहित चाहत्यांची उत्सुकता नेटफ्लिक्सनं वाढवली आहे. पहिल्या सिझनमध्ये काटेकर, कुक्कू, बंटी, गणेश गायतोंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे काय घडणार याचं कुतूहल सर्वांना आहे. अशातच नव्या व्हिडिओत आता दोन नवीन पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. दुसऱ्या सिझनमध्ये कलकी कोचलीन आणि रणवीर शौरी यांची एण्ट्री पाहायला मिळणार आहे.
Iss khel ka asli baap kaun? pic.twitter.com/epvUzWm4OL
— Sacred Games (@SacredGames_TV) May 6, 2019
त्रिवेदी नेमके कोण आहे? त्यांची भूमिका काय ? मुंबईवर येणाऱ्या संकटांचा खरा सुत्रधार त्रिवेदी तर नाही ना? यांसारख्या अनेक प्रश्नांवरून पुढील भागात पडदा उठणार आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेली ही वेबसीरिज हिट तर झाली होती मात्र तितकीच वादातही सापडली होती. शिवीगाळ, रंजक अश्लिल दृश्य या कारणामुळे या सीरिजवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. २००६ साली प्रकाशित झालेल्या विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' या कांदबरीवर ही सीरिज आधारलेली आहे.