पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फोन हिसकावणाऱ्या सलमानविरोधात चाहत्याची तक्रार

सलमान खान

अभिनेता सलमान खानविरोधात चाहत्याचा फोन हिसकावल्याप्रकरणी मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी सलमान आणि त्याचे काही अंगरक्षक जुहूच्या रस्त्यावर सायकल चालवत होते. सलमानला  रस्त्यावर सायकल चालवताना पाहून चाहते आणि काही पत्रकार त्याचे  फोटो घेण्यासाठी पुढे सरसावले. मात्र यावेळी सलमानने आपला फोन हिसकावून घेतल्याचा आरोप  अशोक पांडे नावाच्या व्यक्तीनं केला आहे.

सायकल चालवणाऱ्या सलमानचे  फोटो काढण्यास अनेकांनी सुरूवात केली.  तेव्हा सलमान आणि त्याच्या अंगरक्षकांनी फोटो आणि व्हिडिओ काढू नका असं अनेक वेळा चाहते आणि पत्रकारांना  बजावलं. मात्र त्यांचं कोणीच ऐकायला तयार नव्हतं. त्यातच सलमानच्या बाजूला एक गाडी उभी राहिली. या गाडीतून अशोक पांडे सतत सलमानचा व्हिडिओ काढत होते. अशोक पांडे यांनादेखील सलमानने व्हिडिओ न काढण्याची विनंती केली. मात्र अशोक पांडे त्याचं ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे नाइलाजाने सलमानने त्यांचा फोन हिसकावून घेतला. मात्र समज देऊन सलमानच्या अंगरक्षकांनी तो परतही दिला अशी माहिती काहींनी दिली.

मात्र या प्रकरणानंतर सलमान विरोधात अशोक पांडे यांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे सलमानच्या अंगरक्षकानेही या प्रकरणासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सलमानचा पाठलाग करण्याचा आणि विना परवानगी व्हिडिओ शूट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.