पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Avatar 2 : दुसरा ‘अवतार’ जन्मण्यासाठी २०२१ पर्यंतची प्रतीक्षा

अवतार 2

‘अवतार’ हा चित्रपट  हॉलिवूड सिनेमासृष्टीत आजवर प्रदर्शित झालेल्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक गणला जातो.  २००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं उत्कृष्ट अ‍ॅनिमेशन, दर्जेदार अभिनय, उत्तम पटकथा आणि योग्य दिग्दर्शन यांच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी एक अकल्पित स्वप्न प्रत्यक्षात उतरून दाखवलं होतं. २००९ साली या चित्रपटानं सर्वाधिक कमाईही केली होती, या चित्रपटाच्या यशानंतर  जेम्स यांनी सीक्वलची घोषणा केली मात्र आता या गोष्टीला १० वर्षे उलटली तरी सीक्वलचा पत्ता नाही. जगभरातले कॅमरून यांचे चाहते  ‘अवतार’ च्या प्रतीक्षेत आहे. अखेर चित्रपटाच्या सीक्वल संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली असून या चित्रपटासाठी आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'अवतार २' हा १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट डिसेंबर २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र अवतार सीरिजमधले इतर भाग हे आता २०२३, २०२५ आणि २०२७ मध्य प्रदर्शित होणार असल्याची  अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.  २१५४ सालापर्यंत पृथ्वीवरील सर्व खनिजसंपत्तीचा उपभोग मानवानं  घेतला आहे.  पृथ्वीवरील खनिजसंपत्तीचा ऱ्हास झाला आहे. मानवाला नव्या उर्जासाठ्यांची नितांत गरज आहे आणि या गरजेतून ‘पँडोरा’ नामक ग्रहावर माणूस पोहोचतो. मात्र या ग्रहाचं हवामान मानवासाठी विषारी असतं. या ग्रहावर निळसर त्वचा असलेले  १० फूट उंच काहीसे मानवासारखे दिसणारे जीव राहत असतात. या ग्रहावर कब्जा करण्यासाठी  मानव तंत्र वापरून त्याच्यासारखाच जीव तयार करतो तो अवतार म्हणून ओळखला जातो. 

‘पँडोरा’ वरची अफाट खनिज संपत्ती पाहून त्या ग्रहावर कब्जा करण्याचा विचार मानवाच्या मनात येतो त्यासाठी मानवाने सुरू केलेले प्रयत्न आणि पँडोराच्या रहिवाशांनी  केलेला विरोध यांची संघर्षकथा यामध्ये आहे.  पुढच्या सीक्वलमध्ये यापेक्षाही वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं बजेट सर्वाधिक आहे.