पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंग्रेजी मीडियमेच शूटिंग सुरू, इरफान खान पुन्हा कॅमेऱ्यासमोर

अंग्रेजी मीडियमच्या शूटिंगवेळी इरफान खान

गेल्या काही महिन्यांपासून उपचारांसाठी परदेशात असलेला अभिनेता इरफान खान परतला असून, त्याने त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली आहे. हिंदी मीडियम या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल अंग्रेजी मीडियमचे शूटिंग नुकतेच उदयपूरमध्ये सुरू झाले. या चित्रपटात इरफान खान प्रमुख भूमिका साकारत आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगच्या फोटोंमध्ये इरफान खान दिसतो आहे.

गेल्या महिन्यातच इरफान खान त्याच्यावरील उपचारांनंतर भारतात परतला होता. साधारणपणे एक वर्षापासून इरफान खान आजारपणामुळे चित्रपटसृष्टीपासून दूर होता. हिंदी मीडियम चित्रपटाला २०१७ मध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर अंग्रेजी मीडियम चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाची इरफानचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत.

अंग्रेजी मीडियमच्या शूटिंगवेळी इरफान खान

इरफानची मुलगी लंडनमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर तिथे काय घडते, याची कथा अंग्रेजी मीडियम चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात येईल. अंग्रेजी मीडियममध्ये इरफान खानसोबत अभिनेत्री करिना कपूर असल्याची माहिती मिळाली आहे. तर राधिका मदानने त्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट उदयपूर आणि लंडनमध्ये चित्रित करण्यात येणार आहे.

हिंदी मीडियम या चित्रपटातील भूमिकेबद्दल इरफान खानला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री साबा कमरने इरफानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच इरफान खानने ट्विटरच्या माध्यमातून तो भारतात परतल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होते. काही पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्येही त्याला मुंबई विमानतळावर कैद केले होते.