पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादा कोंडके हे मला आवडलेले एकमेव नट- नवाज

नवाजुद्दीन सिद्दीकी दादा कोंडके

गतवर्षात 'मंटो', 'ठाकरे'सारखे यशस्वी चित्रपट नवाजुद्दीन सिद्दीकीनं दिले. या चित्रपटासोबतच नेटफ्लिक्सवरच्या 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजमधली गणेश गायतोंडेची  भूमिकाही  विशेष गाजली.  हिंदी  चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेला नवाज हिंदी चित्रपट फारसे पाहत नाही.  मात्र मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून असलेले दिवंगत अभिनेते दादा कोंडके हे नवाजला सर्वाधिक भावले. नवाजनं हिंदूस्थान टाईम्सशी साधलेल्या संवादात दादा कोंडके यांचं भरभरून कौतुक केलं. 'हिरो' विषयी आपल्या ज्या संकल्पना मनात कोरल्या आहेत त्या  सर्व संकल्पनेला छेद देत त्यांनी स्वत:ची वेगळी  ओळख निर्माण केली. त्यांची हिच शैली मला भावली, असं नवाज सांगतो.

'मला दादा कोंडके मनापासून आवडतात. लोक अजूनही म्हणतात की दादा कोंडके यांचे चित्रपट द्विअर्थी  आहेत. लोक काहीही म्हणत असले तरी मला आवडलेले ते एकमेव अभिनेते आहेत. त्यांनी अभिनेत्याच्या संपूर्ण संकल्पना मोडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  आज हिरो म्हणजे ब्रँडेड कपडे स्टाईल यासाठी ओळखला जातो. मात्र दादा कोंडके यांना ग्लॅमरची पर्वा नव्हती. आपण कसे दिसतोय हा मुद्दा तर त्यांच्यासाठी अगदीच गौण होता. त्यांचे कपडे हे अगदी सामान्य माणसांप्रमाणेच होते. मला  या  सगळ्या गोष्टी खूपच भावल्या',  अस नवाज म्हणाला.

नवाजनं 'ठाकरे' चित्रपटात काम केलं. या  चित्रपटात त्यानं दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती. मी आतापर्यंत साकारलेली सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक  भूमिका होती आणि ही भूमिका साकारल्याचा  मला  अभिमान वाटतो असंही नवाजनं एका मुलाखतीत सांगितलं  होतं.  नवाजचा रात अकेली है हा चित्रपट लवकरच येणार  आहे. काहीदिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं.