पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिकचा 'सुपर ३०' या चार कारणांसाठी नक्की पाहावा

सुपर ३०

अभिनेता हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला देशभरात प्रदर्शित होत आहे. खरं तर हा चित्रपट फार पूर्वीच प्रदर्शित होणं अपेक्षित होतं, मात्र अनेक कारणांमुळे चित्रपटाचं चित्रीकरण रखडलं. अखेर मार्गातल्या सर्व अडचणी दूर करून प्रदर्शनासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे. हा चित्रपट चांगला की वाईट हे सांगण्यापेक्षा तो का पाहावा याची चार कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आनंद कुमार
हा चित्रपट पाहण्याचं पहिलं कारण म्हणजे आनंद कुमार होय. या चित्रपटाची संपूर्ण कथा आनंद कुमार यांच्यापासून प्रेरित आहे. आनंद कुमार यांनी गरीब मुलांसाठी दिलेल्या योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली आहे. मात्र अनेकांना आनंद कुमार यांच्याविषयी खूपच कमी माहिती आहे. अत्यंत हुशार गणिततज्ज्ञाचं व्यवस्थेत असणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींमुळे नुकसान होतं. उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहणाऱ्या गरीब मुलाचं स्वप्न मातीमोल होतं. पापड विकण्याची वेळ त्यांच्यावर येते. पण पुढे तेच गरीब मुलांना मोफत आयआयटीसाठी शिकवणी देतात. मात्र हा प्रवास वाचायला जितका सोप्पा, साधा, सरळ वाटतो तितका तो नक्कीच नाही. त्यामुळे आनंद कुमार यांनी गरीब मुलांच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.

हृतिक रोशन 
चित्रपट पाहण्याचं दुसरं  कारण म्हणजे खुद्द हृतिक रोशन. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर हृतिकची अनेकांची खिल्ली उडवली होती. बिहारी भाषेचा लहेजा हृतिकला काही जमला नाही, असं अनेकांचं मत पडलं. मात्र चित्रपट पाहताना या सर्व गोष्टी गौण वाटू लागतात आणि समोर फक्त दिसते ती एका ध्येयानं पछाडलेल्या आनंद कुमारची गोष्ट. हृतिकनं आनंद कुमार यांना आणि भूमिकेस योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१७ मध्ये हृतिकचा 'काबील' चित्रपट आला. त्यानंतर दोन वर्षांनी हृतिक रुपेरी पडद्यावर दिसला. म्हणूनच जर तुम्ही हृतिकचे चाहते असाल तर नक्कीच हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट हृतिकच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट ठरेन हे  नक्कीच . 

कथा 
चित्रपटाची कथा तितकीच प्रभावी आहे. तिला भावना, नाटकीपणा यांची किनारही आहे पण चित्रपट म्हटला की, या सर्व गोष्टी आल्याच. गणित या विषयाबद्दल  टोकाचं प्रेम असणाऱ्या व्यक्तीची ही कथा आहे. किंबहुना गणित हा विषय आपली प्रेयसी आहे, असं मानून चालणारा वेडा आनंद सुरूवातीला दिसतो. मात्र नशीबाचे फासे पलटतात, पैशांअभावी परदेशी जाऊन चांगलं शिक्षण घेण्याचं त्याचं स्वप्न भंगतं आणि आनंद  कुमारवर पापड विकण्याची वेळ येते. दरम्यानच्या काळात शिक्षण ही पैसे कमावण्याची फॅक्टरी आहे असं मानणाऱ्या व्यक्तीशी आनंदची ओळख होते. आनंद कुमारच्या बुद्धीमत्तेचा वापर करून  कोचिंग क्लासचा प्रमुख अफाट पैसे कमावण्याचा डाव साधतो. आनंद कुमारची बेताची परिस्थितीही सुधारते, मात्र आयआयटीसारख्या संस्थेत श्रीमंत मुलं शिक्षण घेतात तर गरीबांची मुलं मात्र मागेच राहतात याची जाणीव त्यांना होते. 
हातरिक्षा चालवणारा एक व्यक्ती सहज शब्दांत पैशांच्या मायेत अडकलेल्या आनंदला याची जाणीव करून देतो. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा’ हे वडीलांचं वाक्य आनंदला आठवतं आणि आयुष्यात कमावलेली सारी जमापुंजी आनंद केवळ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी लावतो. शिक्षणाची भूक असलेल्या ३० मुलांना आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी तयार करणाऱ्या या ध्येयवेड्या व्यक्तीची कथा यात आहे. हे आनंद कुमार कसं साध्य करतो, कोणत्याही सुविधा नसताना ही गरीब मुलं खरंच आयआयटीची प्रवेश परीक्षा पास होतात का हे पाहण्यासाठी  हा चित्रपट नक्की पहा.

प्रेरणा 
आनंद कुमार आणि त्यांनी शिक्षण दिलेल्या प्रत्येक मुलांची कथा ही प्रेरणादायी आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टींचा  न्यूनगंड असतो हा न्यूनगंड आपल्याला प्रगतीपासून रोखत असतो. गरीब घरातून आलेली मुलं हुशार तर होती मात्र आपल्या न्यूनगंडामुळे अनेकदा ती मागे राहिली. या मुलांचा न्यूनगंड दूर करून त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम आनंद यांनी केली. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेरणादायी देखील आहे. त्यामुळे या चार कारणांसाठी हा चित्रपट एकदा  कुटुंबीयांसोबत पहायला हरकत नाही.