पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : मेकॅनिकल इंजिनिअर ते सर्वोत्कृष्ट अभिनेता

गिरीश कुलकर्णी

मराठी नाटय चित्रपट सृष्टीमधल्या उत्तम अभिनेत्यांच्या यादीतलं एक महत्त्वाचं नांव म्हणजे, 'गिरीश पांडुरंग कुलकर्णी'. याचा आज वाढदिवस. गिरीशचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा इथे झाला. पण, त्याचं शालेय शिक्षण पुण्यातल्या नवीन मराठी शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल इथे झालं. लातूर इथून गिरीशनं मेकॅनिकल अभियांत्रिकी मधील पदविका प्राप्त केली. लातूरमध्ये शिक्षण घेत असताना त्यानं रंगभूमीवर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती. पदविका पूर्ण केल्यानंतर काही काळ त्याने 'रेडीओ मिर्ची' मध्ये क्लस्टर प्रोग्रामिंग हेड म्हणूनही काही काळ काम पाहिलं.

Happy Birthday : कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे मेघ'राज'

त्यानंतर मात्र त्यानं लेखनावर आपले लक्ष केंद्रित केलं. ‘संस्कार भारती’च्या नाट्यविभागात गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आणि श्रीकांत यादव या त्रिकुटानं विविध प्रयोग केले. अनेक एकांकिका केल्या आणि गाजवल्या देखील. 'प्रसंगोत्पात' ही त्यांची एकांकिका विशेष गाजली आणि तिने अनेक पुरस्कारही प्राप्त केले. समाजस्वास्थ्य, आनंद भोग अशा नाटकांमध्येही त्याने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली.
उमेश कुलकर्णीनं ‘एफटीआयआय’साठी केलेल्या लघुपटांच्या निर्मितीमध्ये त्याला गिरीशची मोठी मदत मिळाली. त्यानंतर आपल्याला भावेल असाच चित्रपट करायचा, या इराद्यानं या जोडीनं या क्षेत्रात उडी घेतली. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ या चित्रपटामुळे 'गिरीश कुलकर्णी' हे नाव रसिकांना माहीत झालं. या चित्रपटाच्या लेखनाबरोबरच त्यानं त्यामधील ‘जिवन्या’ ही मुख्य व्यक्तिरेखादेखील साकारली होती. वळू बरोबरच ‘विहीर’, ‘देऊळ’ ‘मसाला’ 'धप्पा' या चित्रपटांचेही उत्तम लेखन गिरीशनं केले. अभिनयाची आवड असलेल्या या अप्रतिम अभिनेत्याला कारकिर्दीच्या सुरुवातीलाच चांगल्या भूमिका मिळाल्यामुळे त्याच्या आवडीला खतपाणी मिळालं. 

Happy Birthday : मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीमधला 'चॉकलेट बॉय'

‘गाभरीचा पाऊस’ या चित्रपटामध्ये त्यानं साकारलेली शेतकर्‍याची भूमिका लक्षणीय ठरली. 'देऊळ’ चित्रपट त्याच्या अभिनय प्रवासातला सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसंच या चित्रपटातल्या खटकेबाज संवादलेखनासाठी त्याला सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचाही पुरस्कार मिळाला. 'मसाला', 'पुणे ५२', 'जाऊ द्या ना बाळासाहेब', 'फास्टर फेणे', 'बॉईज २', 'भाई व्यक्ती की वल्ली' या मराठी तर, ‘अग्ली’, ‘दंगल’, ‘काबिल’, ‘फेनी खान’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने ताकदीच्या दिग्दर्शकासोबत काम करत आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक दाखवून दिली. 'सेक्रेड गेम' या वेबसीरीज मधील त्यानं वठवलेलं पात्र अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे.  'पानी फाऊंडेशन' मधेही हा संवेदनशील अभिनेता कार्यरत आहे. अशा या लेखक, अभिनेता, निर्माता असलेल्या माणूसपण जपणाऱ्या अप्रतिम मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

'गर्ल्स'मध्ये झळकणार स्वानंद किरकिरे

#नाट्यकर्मीविजू