पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी धार्मिक नाही,पण बाप्पाशी माझं वेगळंच नातं: भूषण प्रधान

भूषण प्रधान सेल्फी विथ बाप्पा

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. कलाकारही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसते. अभिनेता भूषण प्रधानच्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने पण अगदी उत्साहात साजरा केला जातो. घरच्या गणपतीविषयी भूषण प्रधान म्हणाला, मुंबईत घर घेतल्यापासून मी गणपती बसवायला सुरुवात केली. यंदाचं हे चौथं वर्षं आहे. मागच्या तीन वर्षांप्रमाणेच यंदा सुद्धा आई शाडूच्या मातीची मूर्ती बनवणार आहे आणि त्याचीच स्थापना घरी करणार आहोत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सव खूप उत्साहात, प्रसन्न वातावरणात साजरा करणार आहे.

भूषण प्रधानची आई शाडूच्या मातीची मूर्ती चिंचवडच्या घरी बनवते आणि त्याची स्थापना कांदिवलीच्या घरात केली जाते. त्यामुळेच बाप्पा चिंचवड आणि मुंबईतील दोन्ही घरांशी जोडला गेला आहे. तो पुढे म्हणाला, माझ्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा केला जातो. सजावटसुद्धा पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येईल, अशीच असते, गणपती बाप्पाला आपण मूर्तीच्या रूपात आणतो, परंतु खऱ्या अर्थांने बाप्पा या दिवसांत आपल्या घरी येतो, तो पाहुण्यांच्या रूपात. जसं बाप्पाच्या चेहऱ्यावर जे हास्य आपल्याला दिसतं, तसंच हास्य मला घरी आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर बघायचं असतं.  

गणेशोत्सव २०१९ : ....म्हणून गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले वाहतात

या दीड दिवसांत दर्शनासाठी आमच्या घरी भरपूर लोकं येतात. खरं सांगायचं तर मी तितका धार्मिक नाही. तरीही गणपती बाप्पाशी माझं एक वेगळंच नातं आहे. वर्षभरात मी अध्यात्मिक नसतो, त्या वर्षभराची कसर या दीड दिवसांत भरून निघते. खूपच वेगळं वातावरण असतं घरी.  आमच्याकडे विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीनेच केले जाते. माझ्या घरात असलेल्या मोकळ्या भागात आम्ही बादलीत विसर्जन करतो. त्यासाठी फुलांची सजावट केलेली असते. बादलीतही गुलाब पाणी, अक्षता आणि फुलं असतात. विसर्जन झाल्यावर, बाप्पाची मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर त्याच शाडूच्या मातीनं आम्ही दरवर्षी एक हत्तीची प्रतिमा बनवतो. आणि ते हत्तीचं गोंडस रूप आमच्या घरी ठेवतो.

गणेशोत्सव २०१९ रेसिपी : उकडीचे पान गुलकंद मोदक

मी रोज देवळात वगैरे जात नसलो तरी दिवसातून एकदा तरी बाप्पाशी संभाषण साधतो, असेही भूषण यावेळी म्हणाला. मनातल्या मनात का होईना मी बाप्पाशी बोलत असतो. हे कायमच नातं आहे आणि बाप्पा कायम आपल्या सोबत आहे, याची जाणीव असते. तो मार्ग दाखवत असतो, असे नेहमीच वाटते. बाप्पाकडे मी कधीच काहीही मागत नाही. कारण तो जे देतो, ते माझ्या चांगल्यासाठी आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आपण मात्र शंभर टक्के प्रयत्न करायचा, हे लक्षात ठेवून मी आयुष्यात पुढे चालत आहे. बाप्पानेच दाखवलेला हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळेच मी नवीन जोमाने काम करू शकतो. गणेशोत्सवानंतर भूषण प्रधान आगामी चित्रपट 'लग्नकल्लोळ'च्या डबिंगच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.