पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाप्पा माझ्या 'लग्नकल्लोळ' चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू दे!

मयुरी देशमुख

गणपती आवडते दैवत असल्याने अभिनेत्री मयुरी देशमुखसाठी गणेश चतुर्थीचा उत्सव खूप खास असाच असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मयुरीने या उत्सवाबद्दलच्या आपल्या मनातील भावना मनापासून व्यक्त केल्या ती म्हणाली की, माझ्या स्वतःच्या घरी अजून गणपती आणण्याची प्रथा सुरु केली नसल्याने मी अजूनही आईकडेच गणेशोत्सव साजरा करते. आमच्याकडची मूर्ती इको फ्रेंडली असते. 

गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा संदेशही तिने दिला. सध्या 'ट्री गणेशा' मिळतो, ज्यात गणेशाची मातीची मूर्ती कुंडीत असते. विसर्जनाच्या वेळी फक्त पाणी टाकून ती माती सारख्या पातळीवर आणायची. त्यात एक बी असते. त्याचे नंतर झाड येते. मला ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे आमच्याकडे गणेशाची अशा पद्धतीची मूर्ती आणली जाते. सजावटही अगदी साधी असते. ज्यात थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर अजिबात नसतो. 

मी धार्मिक नाही,पण बाप्पाशी माझं वेगळंच नातं: भूषण प्रधान

नैवैद्यासाठी बाहेरून गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोडधोड पदार्थ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि यात घरातील प्रत्येकाचा सहभाग असतो. या काळात एकंदरच घर आणि मन दोन्ही सकारात्मकतेने भरलेले असते. लहानपणापासूनच मला बाप्पाबद्दल विशेष ओढ आहे. कधीकधी अडचणीच्या काळात आपण डोळे बंद करून देवाची आठवण काढतो, तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर गणपतीचा चेहरा येतो. सिद्धिविनायक माझ्या घराजवळ आहे. मी अनेकदा सिद्धिविनायकला जाते. कॉलेजमध्ये असतानाही मला आठवतंय, मी आणि माझी मैत्रीण आम्ही चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचो. तेव्हा मी चर्चगेटला राहायचे. तेव्हा चर्चगेट ते सिद्धिविनायक मी चालत जायचे. आम्ही अडचणींचे निराकरण करण्यासाठी सिद्धाविनायकला जायचो आणि आमच्या इच्छा पूर्णही व्हायच्या. त्यामुळे बाप्पाशी अनेक कारणांनी मी जोडले गेले आहे. 

..म्हणून अमितचा यंदाचा गणेशोत्सव दणक्यात!

बाप्पाविषयीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की, मी अनेकदा अथर्वशीर्षं म्हणत असते. दोन वर्षांपूर्वी सिद्धिविनायकला आदेश बांदेकर यांनी अथर्वशीर्षं कथन जपाचे आयोजन केले होते. जिथे अनुराधा पौडवाल त्यांच्या सुमधुर आवाजात अथर्वशीर्षं म्हणणार होत्या. आम्ही 'झी मराठी'च्या काही अभिनेत्री त्यांच्या सोबत अथर्वशीर्षं म्हणणार होतो. त्यावेळचे वातावरण एकंदरच चैतन्यदायी होते. सकारात्मक लहरी सर्वत्र निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी मला असं वाटलं, की मी आठवीपासून सातत्यानं अथर्वशीर्षंचा जप करत आले आहे, त्याचं मला कुठेतरी हे फळ मिळालं असावं. माझ्यासाठी हा अद्भुत अनुभव होता. गणपती बाप्पा सदैव पाठीशी असतो. यंदाही मी बाप्पाकडे एक मागणं करणार आहे. माझ्या प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'लग्नकल्लोळ' या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू दे! आणि बाप्पा माझं हे मागणं सुद्धा ऐकेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ganesh chaturthi 2019 good response by my upcomming movie lagna kallol Mayuri Deshmukh pray for gnesha