दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फर्जंद' चित्रपट तुफान गाजला होता. गतवर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होता. दीड महिन्यांहून अधिक काळ हा चित्रपट सिनेमागृहात चालला. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल यांनी 'फत्तेशिकस्त' चित्रपटाची घोषणा केली. स्वराज्याच्या इतिहासातील पहिलं सर्जिकल स्ट्राईक्स अशा शब्दात या चित्रपटाचं प्रमोशनही सोशल मीडियावर झालं. या चित्रपटाच्या निमित्तानं 'हिंदूस्थान टाइम्स'शी साधलेल्या संवादात चित्रपटाच्या संकल्पनेविषयी अनेक कांगोरे दिग्पाल यांनी उलगडले आहेत.
'फर्जंद चित्रपटाची कथा ही कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा सांगते. पण फत्तेशिकस्त हा चित्रपट महाराजांच्या युद्धनितीची आणि एका मोठ्या मोहिमेची गोष्ट सांगणारा आहे. पहिला सर्जिकल स्ट्राईक जरी महाराजांनी केला असला तरी यामागची व्यूहात्मक रचना ही जिजाऊ मातांची होती.' असं दिग्पाल म्हणाले.
'फत्तेशिकस्त' हा 'फर्जंद' चित्रपटाचा सीक्वल असल्याची चर्चा होती. मात्र हा चित्रपट सीक्वल किंवा प्रीक्वल नसून महाराजांवरील चित्रपट मालिकांचा एक भाग असणार आहे असंही ते म्हणाले. 'फर्जंद'मध्ये अनेक ठिकाणी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला होता मात्र आता प्रत्यक्ष गडावर चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार असल्याचं ते म्हणाले.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी जिजाऊ मातांच्या भूमिकेत दिसेन तर शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर चित्रपटात साकारणार आहे.