पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अन् डॉक्टर 'नटसम्राट' होऊन 'सिंहासना'वर विराजमान झाले...

डॉ. श्रीराम लागू

डॉ. श्रीराम लागू.. मराठी प्रेक्षकांच्या हृदयातील 'सिंहासना'वर विराजमान झालेले अनभिषिक्त 'नटसम्राट' होय. 'नटसम्राट', 'मित्र, 'जगन्नाथाचा रथ', 'सुंदर मी होणार', 'हिमालयाची सावली' सारख्या अनेक नाटकांतील भूमिका डॉक्टरांनी अजरामर केल्या. वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' नाटकातील अप्पासाहेबांची भूमिका साकरण्याचं शिवधनुष्य लागूंनी पेललं आणि प्रेक्षकांसह सर्वांची मनं त्यांनी जिंकली. या 'तूफाना'नं त्यानंतर रंगभूमीवर शब्दश: राज्य केलं.

फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. एमबीबीएस पदवी मिळविल्यानंतर ईएनटी सर्जन म्हणून त्यांनी पुण्यात रीतसर प्रॅक्टिस सुरू केली. मात्र डॉक्टर या पेशापेक्षा रंगभूमीकडची ओढ त्यांना अधिक खुणावत होती. एकीकडे मेडिकल प्रॅक्टिस तर दुसरीकडे नाटकांची तालिम असा धावपळीचा प्रवास त्यांच्या सुरु होता. मात्र आवडीला काहीशी मुरड घालत ते उच्च शिक्षणासाठी इंग्लड आणि कॅनडाला  गेले. काही काळी आफ्रिकेच्या टांझानियातही त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. 
मात्र एक सच्चा कलाकार रंगभूमीपासून दीर्घ काळ दूर राहू शकत नाही, ती ओढ स्वस्थ बसू देत नाही, असंच काहीसं डॉक्टरांसोबतही झालं. त्यांनी पूर्णवेळ या रंगभूमीची सेवा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 'नटसम्राट', 'हिमालयाची सावली', 'सूर्य पाहिलेला माणूस'  सारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधल्या डॉ. लागूंच्या भूमिका गाजल्या. 'नटसम्राट'च्या तुफान यशानंतर त्यांना पिंजरा चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. या संधींचंही डॉक्टरांनी सोनं केलं. त्यांची 'पिंजरा'मधील मास्तरांची भूमिका लोकप्रिय ठरली. 'पिंजरा', 'सामना', 'सिंहासन' हे लागूंचे चित्रपट त्यांच्या नाटकांइतकेच सुपरडुपरहिट ठरले. 

मात्र सिने- नाट्यसुष्टीत काम करताना डॉक्टरांनी समानजभानही तितकंच जपलं. डॉक्टर नेहमीच आपल्या खंबीर भूमिकेसाठी ओळखले जायचे. अनेक विवादाच्यावेळी डॉक्टरांनी काही रोखठोक भूमिका घेतल्या आणि आपल्या भूमिकांवर ते नेहमीच ठाम राहिले.