छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित 'फत्तेशिकस्त' हा मराठी चित्रपट लवकरच येत आहे. 'महाराष्ट्र दिना'चं औचित्य साधत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'फत्तेशिकस्त' चित्रपटाची घोषणा केली. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर स्वराज्याच्या इतिहासातलं आणखी एक सोनेरी पान उलगडणार आहे. भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक्स असं म्हणत कलाकारांनी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. महाराजांचा गनिमीकावा आणि कालसुसंगत युद्धनीतीच्या कथा आपण इतिहासात ऐकल्या, वाचल्या आहेत. ही शत्रूला नमोहरण करून सोडणारी, शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची ही युद्धनिती 'फत्तेशिकस्त' चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'फर्जंद' चित्रपटातील अनेक कलाकार फत्तेशिकस्तमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून मराठी प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.