पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतिदिन विशेष : सिने-नाट्यसृष्टीतला मुरब्बी कलाकार

प्रकाश इनामदार

काही कलाकार दुसऱ्यावर विनोद करुन हशे वसूल करतात. तर, काही स्वत:वरच विनोद करुन सात मजली हास्याचे तुषार निर्माण करतात. अशाच एका मुरब्बी कलाकाराने स्वत:च स्वत:च्या रंगभूमीवरच्या पदार्पणाचं वर्णन खुप मार्मिक पध्दतीनं केलं होतं. 

आजारी असल्यानं बच्चन अनुपस्थित, २९ डिसेंबरला करणार पुरस्कार प्रदान

ते असं, "माझं नाव प्रकाश विठ्ठल इनामदार, कै. अप्पासाहेब इनामदार यांचा मी मुलगा. माझा जन्म पुण्याचा. वडील कै. अप्पासाहेब इनामदरांकडून मला कलेचा वारसा मिळाला आणि गेली ४५-५० वर्ष मी निष्ठेने तो जपला. रंगभूमीवर सर्व कलाकार 'येतात'. पण मी मात्र रंगभूमीवर 'पडलो'. माझं पहिलं नाटक भरत नाट्य मंदिर निर्मित झाशीची राणी. माझी भूमिका होती, झाशीच्या राणीचा दत्तक पुत्र दामोदर. माझा रोल आधीच 'बसला' होता. कारण, मला फक्त त्या झोळीत 'बसून' सगळ्यांकडे टकमक बघायचं होत. वय वर्ष १, वजन ३१ पौंड गुटगुटीत असा मी. आणि वडील स्वतः नाटकात असल्यामुळे बाळाची काहीच चिंता नव्हती. चिंता होती ती माझ्या वजनाची. मला पाठूंगळी घेऊन झाशीच्या राणीने तालीम केली नव्हती आणि जशी ती रंगभूमीवर आली, तशी झोळी माझ्या वजनाने फाटली आणि मी रंगभूमीवर पडलो. रंगमंदिरात हशा पिकला आणि माझा सर्वांना हसवण्याचा प्रवास सुरु झाला. रंगभूमीला माझ्या रूपानी एक वजनदार कलाकार मिळाला." हा मुरब्बी कलाकार कोण ? हे सांगायची आता खरंतर गरजच नाही. कारण ते वजनदार व्यक्तिमत्व आपसुकपणेच आपल्या नजरे समोर आलं असणार. प्रकाश विठ्ठल इनामदार. जन्म २८ ऑकटोबर १९५०. हा कलाकार पदार्पणात पडला पण नंतर त्याने यशाची अनेक शिखरं सर केली. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना हसवून हसवून अक्षरश: लोळवलं. 

गूड न्यूज : मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी या गायकाला होती पहिली पसंती

'थांबा थोडं दामटा घोडं', 'विच्छा माझी पुरी करा', 'आतून कीर्तन वरून तमाशा', 'सखाराम हवालदार', 'कथा अकलेच्या कांद्याची', 'बाईचा लळा दौलती खुळा', 'गाढवाचं लग्नं', 'उल्लू दरबार' अशा नाटकांमध्ये त्यांच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग आणि अफलातून हजरजबाबीपणा यामुळे प्रेक्षागृहात हास्यकल्लोळ उसळायचे. त्यांनी 'संगीत सौभद्र', 'संगीत संशयकल्लोळ', 'संगीत मानापमान', 'संगीत होनाजीबाळा', 'कविराय रामजोशी', 'संगीत कट्यार काळजात घुसली' अशा अनेक संगीत नाटकांमधेही आपला स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला. 

स्मृतिदिन : भूमिकेशी समरसून काम करणारा असामान्य कलाकार

'डार्लिंग डार्लिंग', सौजन्याची ऐशी तैशी', 'लेकुरे उदंड झाली', 'बिर्‍हाड वाजलं', 'लफडा सदन', 'करायला गेलो एक', 'सारंगा, आमचं जमलं बर का', 'स्वयंसिद्धा', 'वर्‍हाडी माणसं', 'दिवा जाळू दे सारी रात', 'बेडरूम बेडरूम', 'सासरचं दुखणं', 'संभुसांच्या चाळीत', 'जरा वजन ठेवा', धरपकड', 'सूनबाई घर तुझंच आहे', 'जोडी तुझी माझी', 'महायोग', 'घरोघरी हिच बोंब' या सामाजिक नाटकां बरोबरच, 'बेबंदशाही', 'आग्र्याहून सुटका', 'रायगडला जेव्हा जाग येते' अशा ऐतिहासिक नाटकांतही त्यांनी भुमिका करून रसिकांची दाद मिळवली. इतकंच नाही, तर त्यांच्या पत्नी जयमाला इनामदार यांच्या बरोबर गुदगुल्या आणि टेस्टी मिसळ या द्विपात्री नाटकांमधूनही त्यांनी रसिकांचे मनसोक्त मनोरंजन केलं. थोडक्यात नाटक कुठलंही असो, मग ते वगनाट्य असो, संगीत, सामाजीक, ऐतिहासिक किंवा द्विपात्री नाटक असो रसिकांना त्यांचे सगळे ताण तणाव विसरायला लावून त्यांना मनोरंजनाच्या अनोख्या दुनियेत रममाण करण्याचा त्यांनी जणू ध्यासच घेतला होता.

स्मृतिदिन विशेष : ..अचानक नियतीचे फासे उलटे पडले

 फक्त नाटकच नाही, तर 'मुद्रांक', 'अदला बदली', 'हि पोरगी कोणाची', 'वाजवा रे वाजवा', 'गोष्ट धमाल नाम्याची', 'नसती उठाठेव', 'लेक चालली सासरला', 'जावयाची जात', 'आपली माणसं', 'सतीची पुण्याई', 'स्त्रीधन', 'बिन कामाचा नवरा', 'थोरली जाऊ', 'जगा वेगळी प्रेम कहाणी', 'देवता', 'आयत्या बिळावर नागोबा', 'दुनिया करी सलाम', 'नवरा माझा ब्रम्हचारी', 'माहेरची माणसं', 'चोराच्या मनात चांदणं', 'श्री सिद्धेश्वर माझा पाठीराखा', 'पैजेचा विडा', 'कडकलक्ष्मी', 'दे धडक बेधडक' ह्या चित्रपटांमधे आणि 'टोकन नंबर', 'चांदा ते बांदा', 'श्री व सौ अब्जबुद्धे', 'आधि जाते अक्कल', 'शुभ-मंगल सावधान', 'नसती आफत', 'इंद्रधनुष्य', 'थरार', 'अफलातून', या आमच्या हसऱ्या घरात या मालिकांमधेही त्यांनी आपल्या लाजवाब अभिनयाने रसिकांची मने जिंकली. 'गाढवाचं लग्न' हे त्यांचं सगळ्यात आवडीचं म्हणण्यापेक्षा लाडकं नाटक. त्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं. सगळीकडे गाजलेल्या आणि रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या ह्या नाटकाचे त्यांनी २५०० च्यावर प्रयोग सादर केले. 

रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी अथकपणे प्रवास करणाऱ्या या अवलियाचा प्रवास २३ डिसेंबर २००७ रोजी अचानक थांबला आणि नाट्य वर्तुळात शोककळा पसरली. अशा या नाटकाला वाहून घेतलेल्या मनस्वी कलाकाराला रसिक कधीच विसरु शकणार नाहीत. शरीराच्या वजनाबरोबरच वाक्याचं वजन सांभाळून हमखास हशे वसूल करणाऱ्या या लाजवाब कलाकाराला मानाचा मुजरा...