पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतीदिन विशेष : मराठी सिने-नाट्यसृष्टीतील 'विनोदाचा बादशहा'

लक्ष्मीकांत बेर्डे

‘खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका…पुढं वाकू नका…दोन पैसे देतो मला भिजवून टाका…’ असं म्हणत येणारे लक्ष्मीकांत बेर्डे आणि या गाण्यातून झळकणारा त्यांचा उत्साह आजही अनेकांना त्यावर ताल धरायला भाग पाडतो. ‘ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम’ असं म्हणत, ‘बोल बजरंग बली की जय’ची आरोळी फोडत ठेका धरणारे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे क्या बात है...मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झालेल्या या अफाट माणसाने युनियन हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर भवन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतलं. याचदरम्यान कॉलेजमध्ये असताना तो एकांकिकांमध्ये सहभाग घेत होता. अनेक वेळा साहित्य संघ मंदिरात त्याने बॅक स्टेजर म्हणूनही काम केलं. 

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल, नियामक मंडळाकडून अधिकृत घोषणा

या भन्नाट कलाकाराने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. 'टुरटुर’हे त्याचं नाटक जबरदस्त हिट ठरलं होतं. या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यानंतर आलेल्या 'शांतेचे कार्ट चालू आहे', 'बिघडले स्वर्गाचे दार', 'कार्टी प्रेमात पडली', 'छुमंतर', 'अश्वमेध', 'नांदा सौख्यभरे', 'सर आले धाऊन', 'लेले विरुद्ध लेले', 'उचलबांगडी' अशा अनेक नाटकातून त्यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. १९८५ मध्ये ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर बघता बघता लक्ष्मीकांत बेर्डे लहानथोरांचा ‘लाडका' आणि हवाहवासा 'लक्ष्या' कधी बनला हे विधात्यालाही कळलं नसेल. 

'धुमधडाका' चित्रपटातून लक्ष्यानं खऱ्या अर्थानं हास्याचा धुमधडाका केला. त्यानंतर अशी ही 'बनवाबनवी' , 'थरथराट', 'दे दणादण', 'एकापेक्षा एक', 'भुताचा भाऊ', 'आयत्या घरात घरोबा', 'झपाटलेला', 'हमाल दे धमाल', 'धडाकेबाज', 'पछाडलेला', 'खतरनाक', 'बजरंगाची कमाल', 'शेम टू शेम', 'शेजारी शेजारी', 'फेकाफेकी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यामातून लक्ष्या चांगलाच धुमाकूळ घालत होता. मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना 'मैने प्यार किया', 'साजन', 'बेटा', 'अनाडी', 'द जंटलमॅन', 'तकदीरवाला', 'बेटी नं.1', राजाजी', 'मासुम', 'त्रिनेत्र' आणि 'हम आपके है कौन' अशा अनेक हिंदी चित्रपटातही लक्ष्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. तो विनोदाच्या साच्यातच अडकून बसतो, यांसारख्या विधानांना त्यानं "एक होता विदूषक" सारख्या सिनेमातून खणखणीत उत्तर दिलं..... पु.लं. आणि लक्ष्या या मराठी विनोदजगातल्या ब्रॅडमन - तेंडुलकर युतीचा हा एक गंभीर, आशयघन सिनेमा..... हा सुंदर सिनेमा करून लक्ष्यानं आपलं अभिनयातलं अष्टपैलुत्व साधार सिद्ध केलं. दूरदर्शनवर गाजलेल्या 'गजरा' या कार्यक्रमात तो धम्माल उडवून टाकायचा. 'टोकन नंबर' या ई टिव्ही मराठी वरील मालिकेतही त्याने अशीच धमाल उडवली होती.

 संकटांनाही धीराने तोंड देणारी गुणी अभिनेत्री

पण..चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेल्या, सा-यांच्या लाडक्या लक्ष्यानं १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. तरीही त्याच्या न विसरता येणाऱ्या आठवणींनी तो आपल्या कायमच 'लक्ष्या'त राहिलाय आणि राहिलही.....खरं सांगायचं तर लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक कलाकार नाही, तर ती एक जादू होती. लक्ष्या ग्रेट अभिनेता होता, विनोदाचा बादशाह होता, हिंदीत मराठीचा झेंडा रोवणारा शिलेदार होता आणि एक सच्चा, सहृदय माणूस होता... या सदासतेज विदूषकाच्या स्मृतीला आणि अभिनयाला मानाचा मुजरा.....