पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतिदिन विशेष : '....जगण्याचं टायमिंग मात्र थोडंस चुकलं'

सुधीर जोशी

"डायबेटीसच्या औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका आधी माने" किंवा "दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात....", "ही शुद्ध फसवणूक आहे माने...." 'अशी ही बनवाबनवी', मधल्या या वाक्यांनी चेहऱ्यावर दिलखुलास हास्य पसरतं आणि आठवतो तो एक गोल, गोड, गोंडस चेहरा. तो चेहरा म्हणजे अफलातून टायमिंगची देणगी लाभलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजेच सुधीर जोशी. नाटक कुठलंही असो, या बादशहाचं रंगमंचावर आगमन होताच लोकांच्या हसण्यानं प्रेक्षागृह शब्दशः उसळत राहायचं. 

"सुधीर जोशी" हा गुणवान, अष्टपैलू अभिनेता मराठी रंगभूमीला लाभला, हे रंगभूमीचं भाग्यच. ते भूमिका करायचे नाहीत, भूमिका जगायचे. ज्यांनी त्यांचे कमला, शांतेचं कार्ट चालू आहे, टूरटूर, घर श्रीमंताचं, लपंडाव, अश्वमेध, जोडीदार, सखी शेजारीणी, हॅलो मते आहेत का ? सारख्या नाटकांमधले जबरदस्त आणि वैविध्यपूर्ण परफॉर्मन्सेस पाहिले असतील, त्यांना सुधीर जोशी हे काय रसायन आहे, हे वेगळं सांगायची गरजच नाही.

मराठी रंगचित्रसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व

 रंगभूमीप्रमाणेच अशीही बनवा बनवी, आत्मविश्वास, आपली माणसं, हमाल दे धमाल, आयत्या घरात घरोबा, एक गाडी बाकी अनाडी, भुताचा भाऊ, गंमत जंमत असे अनेक सिनेमे आणि इंद्रधनुष्य, प्रपंच, कॉमेडी डॉट कॉम, पुणेरी पुणेकर, भिकाजी करोडपती, गजरा अशा अनेक टीव्हीमालिका त्यांनी आपल्या अभिनयानं गाजवल्या.

शेवटच्या काळात तू तिथं मी, एक उनाड दिवस किंवा मातीच्या चुली सारखे विविध मूड्सचे चित्रपट देऊन त्यांनी आपलं अष्टपैलुत्व खणखणीतपणे सिद्ध केलं. पण, रंगमंचावर अचुक टायमिंग साधणा-या या अफाट कलाकाराचं जगण्याचं टायमिंग मात्र, १४ डिसेंबर २००५ ला थोडंसं चुकलं आणि त्यांनी अकाली एक्झिट घेतली. पण त्यांची प्रत्येक भूमिका ही नाट्य-चित्रपटप्रेमींच्या मनात अविस्मरणीय अशीच रहाणार आहे. अतिशय सहज अभिनय करणाऱ्या या गुणवान अभिनेत्याला मानाचा मुजरा.....

मकरंद देशपांडे पहिल्यांदाच करणार मराठी नाटकात अभिनय