पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संगीत रंगभूमीवरील 'सावकार'

प्रसाद सावकार

जय गंगे भागिरथी, सावन घन गरजे, नारायणा रमारमणा, ही नाट्यपदे कानावर आली की नाट्यसंगीताला नवसंजीवन देणारा काळ झर्रकन उलगडत जातो आणि एक अग्रणी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहातं, ते म्हणजे 'प्रसाद सावकार'. संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात १४ डिसेंबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. त्यांच्या वडिलांच्या 'रंगबोधेच्छु नाट्यसमाज' या नाट्यसंस्थेत त्यांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच अभिनय आणि गायनाचे संस्कार होत गेले.

मराठी रंगचित्रसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व

 जिंजीहून सुटका या नाटकात बाल शिवाजीची भुमिका साकारून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नाही, तर याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या 'कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान, कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. 

१९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके– पंडितराज जगन्नाथ आणि सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले. प्रसाद सावकारांनी गायलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. विशेषतः पंडितराज जगन्नाथ या नाटकातील जय गंगे या नाट्य पदाने तर लोकप्रियतेचा कळस गाठला आणि प्रसाद सावकारांना श्रेष्ठ गायक-नट असा लौकिक मिळवून दिला. सुवर्णतुला नाटकामधील कृष्ण, मंदारमाला मधील मदनगोपाळ, जय जय गौरीशंकर मधील श्रृंगी, कट्यार काळजात घुसली मधील सदाशिव, तो राजहंस एक मधील कृष्ण या त्यांच्या भुमिका खूप गाजल्या. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. अमृत मोहिनी आणि अवघा रंग एकची झाला ही त्यांच्या प्रमुख भूमिका असलेली अखेरची नाटके.

पुण्यतिथी विशेष : '....जगण्याचं टायमिंग मात्र थोडंस चुकलं'

 पद्मश्री, अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भरदार आणि श्रवणमधुर आवाज, स्वच्छ व शुद्घ वाणी आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती यामुळे ज्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पाडून त्यांना मंत्रमुग्ध करुन टाकते अशा या दिग्गज कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Birthday special blog on Indian vocalist prestigious Padma Shri award winner prasad savkar