पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

HBD केदार! एका नाटकात तीन भूमिका रंगवणारा पहिला कलाकार

केदार शिंदे

मराठी नाटय-चित्रपटसृष्टीतलं चलनी नाणं, सही रे सही, लोच्या झाला रे, आमच्यासारखे आम्हीच ह्या प्रचंड गाजलेल्या आणि हाऊसफुल्लचा इतिहास निर्माण करणाऱ्या नाटकांचा तरुण प्रतिभावान लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे याचा आज (१६ जानेवारी) वाढदिवस. सुप्रसिद्ध शाहीर साबळे  यांचा नातू असलेल्या केदारला घरातून कलेचा वारसा मिळाला. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला कलेची आवड होती. लहानपणी त्याने कथ्थकली आणि मोहिनीअट्टम् हे नृत्य प्रकार शिकून घेतले होते. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' ह्या कार्यक्रमापासून केली. महर्षी दयानंद कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक उत्तमोत्तम एकांकिका लिहिल्या आणि दिग्दर्शितही केल्या. 'भास की आभास' ही त्याची एकांकिका प्रचंड गाजली. अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने अनेक पारितोषिकं मिळवली. भरत जाधव, संतोष पवार, अरुण कदम, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे पाच जण एकत्र येऊन लोकधारा कार्यक्रमात बहार आणायचे. केदारने 'ऑल द बेस्ट' या नाटकात आंधळा, मुका आणि बहिरा या तीनही भूमिका रंगवल्या, असं करणारा तो पहिला कलाकार. 

अमेरिकेत शास्त्रीय संगीताचे क्लास सुरु करणारा सूरसम्राट

केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर केदारने यशस्वी व्यावसायिक नाटकांची शृंखलाच रसिकांसमोर मांडली. त्यात, 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाळा रे गोपाळा', 'गेला उडत', ढ्यँण टॅ ढ्यँण, सौजन्याची ऐशी तैशी ह्या नाटकांचा समावेश होतो. 'सही रे सही' ह्या नाटकानं तर, शुभारंभाच्या प्रयोगाला हाऊसफुल्लचा बोर्ड झळकावून ३६५ दिवसांत ५६७ प्रयोग सादर करण्याचा विक्रमच प्रस्थापित केला. सुबक निर्मित, 'आंधळं दळतंय' ह्या शाहीर साबळ्यांच्या पुनर्जीवित नाटकाचं त्यानं दिग्दर्शन केलं आणि आजोबांची म्हणजेच, 'झुंझाराराव पाटलांची' भूमिकाही त्याने केली होती. त्याने रसिकांची आवड बघून मुख्यतः खळखळून हसवणाऱ्या विनोदी नाटकांचीच रसिकांच्या मनोरंजनासाठी निवड केली. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली. त्यामुळे 'केदार शिंदे = धमाल कॉमेडी' हे एक समीकरणच बनून गेलं आहे. 

किशोर प्रधानः प्रेक्षकांना निखळ हसवणारा खरा विनोदी अभिनेता

नाट्यसृष्टीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय', 'मधू इथे अन चंद्र तिथे' या झी मराठीवरील मालिकांमधून आणि क्या हाल है मिस्टर पांचाल,सुपर सिस्टर्स ह्या हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. तर, 'महाराष्ट्राची लोकधारा' या मालिकेद्वारे त्याने महाराष्ट्रातल्या सर्व लोककला घराघरात पोहोचवल्या. त्याने निर्माण केलेला पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सृष्टिचीस एक प्रकारची क्रांतीच होती. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच 'आयटम साँग'चा वापर करण्यात आला होता. या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे हिने नृत्य केलं होतं. या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. त्यानंतर केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'माझा नवरा तुझी बायको', 'मुक्काम पोस्ट लंडन', 'याचा काही नेम नाही', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'गलगले निघाले', 'इरादा पक्का', 'खो खो', 'ऑन ड्युटी २४ तास', 'अगंबाई अरेच्चा २' यासारखे हिट चित्रपट दिले. 

त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटाचही दिग्दर्शन केलं. अशा या कुठल्याही पारितोषिकाच्या मागे न जाता लोकांचं निखळ मनोरंजन करण्याचा ध्यास मनी धरून लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणाऱ्या प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू