पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: हरहुन्नरी, प्रतिथयश अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता

अजित भुरे

मराठी नाटय सृष्टी मधले प्रतिथयश अभिनेते नाट्य-चित्रनिर्माते, दिग्दर्शक, पार्श्वभाषक, लेखक आणि नाट्यसंस्थाचालक अजित भुरे यांचा आज (१३ जानेवारी) वाढदिवस.

त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतल्या बालमोहन शाळेत आणि पुढील शिक्षण, रूपारेल कॉलेजमध्ये झालं. कॉलेजमधल्या नाट्यप्रेमी मित्रांमुळे आणि एकंदरीतच तिथल्या नाटकासाठीच्या पोषक वातावरणामुळे भुरेंना नाटकाची पहिली ओळख झाली आणि नाटकाविषयीची गोडी निर्माण झाली. तेव्हा त्यांनी काम केलेली "चित्रकथी" ही एकांकिका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पहिली आली होती. त्या सुमारास "इंडियन नॅशनल थिएटर"तर्फे थिएटर ट्रेनिंग आणि रिसर्चचा, डिप्लोमाचा अभ्यासक्रम चालवण्यात येत असे. कमलाकर सोनटक्के हे त्याचे डायरेक्टर होते. अजित भुरे त्या अभ्यासक्रमाला दाखल झाले आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांनी नाटकाला वाहून घेतलं.

अमेरिकेत शास्त्रीय संगीताचे क्लास सुरु करणारा सूरसम्राट

पुढे अजित भुरे आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून 'आंतरनाट्य' नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेचे ’अनाहत’ नावाचं पहिलं नाटक, राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पहिलं आलं. अंतिम फेरीत अजित भुरे यांना दिग्दर्शनाचं बक्षीस मिळालं होतं. त्यानंतर पुढील दहा वर्षांत, अजित भुरे आणि मित्रमंडळींनी जवळजवळ पंधराच्यावर नाटके सादर केली. त्यांमध्ये, जशी मॅकबेथ, ऑथेल्लो, गॅलिलिओ, मातीच्या गाड्याचे प्रकरण ही अभिजात नाटके होती, तशीच सांधा, अखेरचे पर्व व मिटली पापणी ही तीन वेगळ्या प्रकारची नाटकंही होती. या प्रयोगांमध्ये त्यांनी नाट्यदिग्दर्शनाच्या विविध शैलींचा अभ्यास केला आणि त्या उत्कृष्ठ पद्धतीने हाताळल्या सुद्धा. आपलं बुवा असं आहे, काटकोन त्रिकोण, घरात घुसले तारे, ढोलताशे, नको रे बाबा, नेव्हर माइंड, निघाले आज तिकडच्या घरी, प्रेमाच्या गावा जावे, मीटर डाऊन, मुंबई मुंबई, मिस्टर नामदेव म्हणे, सारखं छातीत दुखतंय, सेल्फी, सौजन्याची ऎशी तैशी अशा अनेक नाटकांची निर्मिती त्यांनी त्यांच्या "असीम एंटरटेनमेंट" या नाट्यसंस्थेतर्फे केली. गॅलिलिओ, मेडीया, जयप्रकाश, संसारगाथा, प्रतिव्यास, अखेरचे पर्व, मॅकबेथ, ऐन वसंतात अर्ध्या रात्री, कोळिष्टक, काटकोन त्रिकोण, ढोलताशे अशा काही नाटकांमधे त्यांनी उत्तमोत्तम भूमिकाही केल्या. याशिवाय, अनेक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी सहज सुंदर अभिनय केला आणि रसिकांकडून भरभरुन दाद मिळवली.

किशोर प्रधानः प्रेक्षकांना निखळ हसवणारा खरा विनोदी अभिनेता

त्यांनी आयआयटी इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेचे अनेक वर्षे यशस्वीपणे आयोजन केलं. त्यांनी व स्मृती शिंदे यांनी मिळून ’मालामाल’ ही दूरचित्रवाणी मालिकाही निर्मित केली होती. "रेस्टॉरन्ट" या वेगळ्या पठडीतल्या मराठी चित्रपटाचीची निर्मिती त्यांचीच होती. आहे. ते फेडरल समांतर नाट्यमंचाचे सचिवही आहेत.

Happy Birthday : बोल्ड अँड ब्यूटीफुल रेशम

वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने ते पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही नावाजले जातात. अशा या हरहुन्नरी, प्रतिथयश अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू