पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: आवाजाचा जादूगार, जबरदस्त प्रतिभेचा अभिनेता

उदय सबनीस (छायाचित्रःफेसबुक)

‘जंगल बुक कार्टून मधल्या ‘बघीरा’चा आवाज, ‘गूगल नॅव्हिगेशन्स’वर मराठी सूचना सांगणारा आवाज, ‘आभाळमाया’मधल्या ‘मन्ना’चा किंवा ‘माझे पती सौभाग्यवती’मधल्या दत्ताभाऊंचा आवाज या सगळ्या कॅरेक्टर्स मागचा भारदस्त, आवाज, हा आवाजी श्रीमंती लाभलेल्या जबरदस्त प्रतिभेच्या अभिनेत्याचा म्हणजेच "उदय सबनीस"ह्यांचा आवाज आहे आणि आज या अवलियाचा वाढदिवस...‘सोनेरी क्षणांचे सोबती’ ही ओळ वाचताना आपण ती आपल्याच आवाजात वाचतो. पण जरा पुन्हा ती वाचून बघितली, तर ही ओळ वाचताना आपल्याही नकळत आपल्या कानात सबनीसांचा भारदस्त आवाज घुमतो.

Happy Birthday: मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देणारा लेखक

आवाजाचा जादूगार, आवाजाच्या दुनियेतला दादा माणूस असलेल्या या हसऱ्या अभिनेत्याने, रंजन युवा संस्थेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. कला सरगम या संस्थेतर्फे त्यांनी अनेक एकांकिका गाजवल्या. सुर्याची पिल्ले या नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. लेकुरे उदंड जाली, टूर टूर, मी नथुराम गोडसे बोलतोय, अश्रूंची झाली फुले अशा अनेक नाटकांमधे तर नटरंग, खेळ मांडला, अकिरा, दुनियादारी, रेगे, टाईमपास, चेकमेट, लगे रहो मुन्नाभाई, फेरारी की सवारी अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात आणि आभाळमाया, घाडगे आणि सून, पती माझे सौभाग्यवती, सूर राहू दे अशा अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांची मनं जिंकली. 

Birth Anniversary: मराठी रंगभूमीवरील पराक्रमी वाघ..मोहन वाघ

इतकंच नाही तर, डॉ. बाबासाहेब' या इंग्रजी आणि 'ला कॅक्टस' या फ्रेंच चित्रपटातही त्यांनी आपला कसदार अभिनय केला. कार्टून नेटवर्कच्या पाच हजारांहून अधिक मालिकांसाठी, वर्ल्ड डिस्ने, पोगो या वाहिन्यांसाठी त्यांनी आवाज दिलाय. आयबीएन लोकमत, ई टीव्ही मराठीसाठी चॅनेल व्हॉइस म्हणून काम केलंय. तर झी टीव्ही मराठीच्या अनेक मालिकांच्या जाहिरातीसाठीही त्यांनी आवाज दिलाय. अनेक इंग्रजी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचं हिंदी भाषेत डबिंग करून अनेक कलाकारांना आपला आवाज दिला. सतत आणि सर्वाधिक ऐकला जाणारा कमाल आवाज असं त्यांच्या बाबतीत म्हटलं तर अजिबातच वावगं होणार नाही. अशा या वेळेचा पक्का, निर्भीड, तडफदार, कोणत्याही वादविवादात उडी न घेणाऱ्या आणि अभिनयात वैविध्य आणणाऱ्या जबरदस्त अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू