पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेष : गायनावर नि:स्सीम प्रेम करणारे थोर गायक

(छाया सौजन्य : विजय पटवर्धन/ फेसबुक)

ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकिर्त गायक आणि अनेक मराठी संगीत नाटकांचे संगीतकार रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म २८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ रोजी महाराष्ट्रात, वझरे या गावी झाला. ते दहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईने मोलमजुरी करून त्यांचे पालनपोषण केले. रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी त्या वेळच्या सावंतवाडी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले.

मस्तानीबाईंविषयीच्या त्या संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजाचा आक्षेप

 संगीत शिकणे हे एकच ध्येय घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी बुवांनी घर सोडले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. मध्यंतरी वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. त्यानंतर मायदेशी परतण्याच्या ओढीने ते आपल्या मूळ प्रदेशात आले. 

पुण्यात स्टंट चित्रीत करताना मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला वरुण धवन

सुप्रसिद्ध गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या. स्वातंत्रवीर सावरकर लिखित 'रणदुंदुभी' आणि 'सन्यस्त खड्ग' या संगीत नाटकातली पदे वझेबुवांनी स्वरबद्ध केली होती. 'वधुपरीक्षा', 'संन्यासाचा संसार', 'शहा शिवाजी', 'श्री', 'रणदुंदुभी', 'नेकजात मराठा', 'सोन्याचा कळस' अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफलीही गाजविल्या. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर कमालीची हुकमत होती. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा 'वझेबुवांची गायकी' म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते 'संगीत कला प्रकाश' या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. 

हॉलिवूडमध्ये संधी कशी मिळाली, प्रियांकानं सांगितले त्या दिवसाचे अनुभव

गायनावर नि:स्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापूराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा अनेक कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. संगीतासाठी वाहून घेतलेल्या या प्रतिथयश गायक आणि संगीतकाराचे ५ मे १९४५ रोजी निधन झाले. गायनावर नि:स्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाला मानाचा मुजरा.