पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेष : नाट्य- सिनेसृष्टीत महिलांना मानाचा दर्जा प्राप्त करुन देणाऱ्या 'दुर्गा'

दुर्गा खोटे

मराठी रंगभूमीवरील चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई इथे जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव लाड. घरात घडलेल्या दुर्घटनेमुळे त्यांनी घर चालवण्यासाठी अभिनय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मोहन भवनानींच्या "फरेबी जाल" या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. सुरूवातीला त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. 
प्रभात फिल्म कंपनीच्या "अयोध्येचा राजा", बोलपटात त्यांनी "राणी तारामती"ची अप्रतिम भूमिका केली. याशिवाय  चित्रपटामध्ये त्यांनी गायलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजि सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. प्रभातच्या, "मायामच्छिंद्र" या चित्रपटातही त्यांनी उत्कृष्ट अभिनयाबरोबरच श्रवणीय गाण्यांचाही आविष्कार सादर केला होता. चित्रपटांबरोबरच दुर्गाबाईंनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. 

इंडियन पीपल्स थिएटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केलं. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत "राजमुकूट" या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्‍याजोगा होता. 'बेचाळीसचे आंदोलन', 'कीचकवध', 'भाऊबंदकी', 'शोभेचा पंखा', 'वैजयंती', 'खडाष्टक', 'पतंगाची दोरी', 'कौंतेय', 'संशयकल्लोळ' इत्यादी नाटकांतून जबरदस्त भूमिका केल्या. इतकंच नाही , तर 'वैजयंती', 'कौंतेय', 'पतंगाची दोरी', 'द्रौपदी' या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत "भाऊबंदकी" हे नाटक सर्व भाषांतील नाटकांत सर्वोत्तम ठरलं होतं. दुर्गाबाईंनी त्यात "आनंदीबाईंची" अत्यंत प्रभावी भूमिका केली होती.

'कहो ना प्यार है' नंतर हृतिकला आल्या होत्या ३० हजार लग्नाच्या मागण्या

कलकत्त्याच्या "न्यू थिएटर्स" या प्रख्यात संस्थेनेही त्यांना "राजारानी मीरा" या चित्रपटासाठी पाचारण केलं होतं. तिथे त्यांना "देवकी बोस"सारखा आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक लाभला. कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करावा याचे शिक्षण दुर्गाबाईंना प्रभात फिल्म कंपनीत मिळाले, तर हळुवार व सहजसुंदर अभिनय त्या न्यू थिएटर्समध्ये शिकल्या. त्यानंतर त्या 'सीता', 'पृथ्वीवल्लभ', 'अमरज्योति', 'लाखाराणी', 'हम एक हैं', तसेच 'मुगले आझम', 'नरसीभगत', 'बावर्ची', 'खिलौना', 'बॉबी' आदी विविध हिंदी चित्रपटांत चमकल्या. तसंच 'गीता', 'विदुर', 'जशास तसे', 'पायाची दासी', 'मोरूची मावशी', 'सीता स्वयंवर', 'मायाबाजार' यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. "पायाची दासी" या चित्रपटात खाष्ट सासूची भूमिका करून त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखविला.

दुर्गाबाईंनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की, रसिकांचा, चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच त्यांनी बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी सगळ्यांना दिला. शंभरांहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. शिवाय , पॉल झिलच्या "अवर इंडिया"  व इस्माईल मर्चंट यांच्या "हाऊस-होल्डर"  या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी झकास भूमिका केल्या होत्या.

दीपिकाच्या जेएनयू भेटीवर 'छपाक'च्या दिग्दर्शिका मेघना म्हणतात...

१९५२ साली भारतातर्फे रशियाला भेट दिलेल्या सांस्कृतिक मंडळाच्या त्या एक सदस्या होत्या. दुर्गाबाईंची चित्रपटातील व नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला. १९६१ साली दिल्लीमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. १९६८ साली त्यांना पद्मश्रीचा बहुमान बहाल केला गेला. अलाहाबाद इथे त्यांचा ३१ जानेवारी १९७० रोजी भव्य सत्कार झाला. दुर्गाबाईंच्या अभिनयकलेचा वाङ्‌मयीन सन्मान करण्याच्या उद्देशाने एक गौरवग्रंथ त्यांना अर्पण करण्यात आला; त्याचं प्रकाशन भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालं होतं. १९७२ साली, मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक त्यांना देण्यात आलं होतं. १९७४ च्या बिदाई चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्कार देण्यात आला.

'अनन्या'मधून 'फुलपाखरु' फेम ऋता करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

दुर्गाबाई ज्या वेळी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत होत्या, त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता. त्यामुळे त्यावेळचे कलाकार ठराविक पगारावर स्टुडियोमध्ये काम करायचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर दुर्गाबाईंनी फ्रिलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली. न्यू थिएटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केलं. १९३० च्या दशकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शिका बनल्या आणि त्यांनी 'चरणों की दासी', 'भरत मिलाप' अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. 

१९३१ मध्ये सुरू झालेला त्यांचा चित्रपट प्रवास अनेक दशकं प्रेक्षकांना सुखावत राहिला. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना "दादा साहेब फाळके" पुरस्कारानेही सन्मानीत करण्‍यात आलं. या अप्रतिम अभिनेत्रीने २२ सप्टेंबर १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी आपल्या विलोभनीय अभिनयाने गाजवलेल्या नाटक आणि चित्रपटांमुळे त्या अजूनही रसिकांच्या हृदयात मानाच्या स्थानावर विराजमान आहेत. आपल्या नाटय-चित्रपट सृष्टीच्या प्रवासात महिला कलाकारांना मानाचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या या सुंदर हसतमुख अभिनेत्रीला मानाचा मुजरा...