पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेषः दैवी देणगी लाभलेला दिग्गज कलाकार

दिवंगत दीनानाथ मंगेशकर

खाडिलकरांच्या ‘मानापमान’ या संगीत नाटकातील ‘शुरा मी वंदिले’ ‘रवी मी प्रेम सेवा शरण’ ‘भाली चंद्र असे’ ही पदे तसंच स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या “संन्यस्त खड्गं’ नाटकातील ‘शतजन्म शोधताना’‘, वीर वामनराव जोशी यांच्या “रणदुंदुभि” मधील ‘परवशता पाश दैवे’ या सारखी पदे आजही कानात रुंजी घालायला लावणारं स्वर्गीय आवाज लाभलेलं अत्यंत देखणं आणि सुंदर व्यक्तिमत्व, 'दीनानाथ मंगेशकर'. 

जयंती विशेष: बंडखोर, बेधडक आणि सशक्त अभिनेत्री

गोमंतकातील मंगेशी इथे २९ डिसेंबर १९०० रोजी त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं आत्मसात केलं. ते उपजत धीट आणि हजरजबाबी होते. शिवाय नृत्य आणि संगीत याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती त्यामुळे त्यांनी संगीतात केलेली प्रगती पाहून त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला होता. त्याच कारणासाठी त्यांना एकदम तीन कंपन्यांची बोलावणी आली. पण ती नाकारुन १९१४ मधे किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. पुढे १९१८ मध्ये एका ध्येयवादी, नाविन्याची आवड असलेल्या ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची त्यांनी स्थापना केली. गावोगावी बळवंत संगीत मंडळीची नाटकं गाजू लागली यशाच्या पायर्‍या एका मागोमाग एक सर होत होत्या. त्यावेळी त्यांनी शास्त्रीय गायनात आपल वेगळं स्थान निर्माण केलं.

Happy Birthday: जन्मजात प्रचंड एनर्जीची दैवी देणगी लाभलेला कलाकार

गडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातली 'लतिका', ‘पुण्यप्रभाव’मधली 'कालिंदी', ‘उग्रमंगल’मधली 'पद्मावती', ‘रणदुंदुभी’मधली 'तेजस्विनी', ‘राजसंन्यास’मधली 'शिवांगी' ह्या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करत. हा 'ठुमरी नाच' हे त्या काळी रंगभूमीवरचं फार मोठं आकर्षण ठरलं होतं. ‘मानापमान’मधे धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मधे तपोधन या पुरुष भूमिका त्यांनी केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक आणि स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. गोमंतकात त्यांना कोल्हटकरांनी मास्टर हे उपाधी दिली. उग्रमंगल, एकच प्याला, काँटो में फूल ऊर्फ भक्त प्रल्हाद, गैरसमज, चौदावे रत्‍न, जन्मरहस्य, झुंझारराव, ताज-ए-वफा, देशकंटक, धरम का चाँद ऊर्फ भक्त ध्रुव,, पुण्यप्रभाव, ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, मूकनायक, रणदुंदुभी, राजलक्ष्मी, राजसंन्यास, रामराज्यवियोग, विद्याहरण, वीर विडंबन, वेड्यांचा बाजार, शाकुंतल, शारदा, संन्यस्त खड्ग, सुंदोपसुंद, सौभद्र अशी अनेक नाटकं त्यांच्या सुरेल गायनाने आणि अप्रतिम अभिनयाने गाजली. तर विश्राम बेडेकर ह्यांनी लिहिलेलं ब्रह्मकुमारी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेलं संन्यस्त खड्गं या नाटकांना त्यांनी सुंदर संगीत दिग्दर्शनाने सजवलं. त्यांच्या बलवंत पिक्चर्सने अंधेरी दुनिया, कृष्णार्जुन युद्ध, भक्त पुंडलिक असे काही हिंदी-मराठी चित्रपटही बनवले. या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचेच होतं. 

जयंती विशेष :रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारा 'कालिया' अन् 'रॉबर्ट'

‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती. ते एक उत्तम गायक तर होतेच पण उत्तम ज्योतिषीही होते. त्यांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावर ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा आणि ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झालं. २४ एप्रिल १९४२ रोजी या असामान्य कलाकाराला चिरविश्रांती मिळाली. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थानं अशी दैवी देणगी लाभलेल्या या दिग्गज कलाकाराला मानाचा मुजरा..

Happy Birthday: संधीचं सोनं करणारी गुणी अभिनेत्री


#नाट्यकर्मीविजू