पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेष : विनोदाची अचूक जाण असलेला अफलातून कलाकार विजूमामा

विजय चव्हाण

उंच बांध्याचा, रांगडा व्यक्तिमत्व असणारा आणि विनोदाची अचूक जाण असलेला एक अफलातून कलाकार, जेव्हा साडी नेसून मावशीची भूमिका साकारायचा तेव्हा तो तितकाच नाजूक वाटत असे. तो कलाकार म्हणजे सर्व कलाकारांचा लाडका विजूमामा, म्हणजेच "विजय चव्हाण". त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९५५ रोजी मुंबईतल्या लालबाग इथे झाला. 

भारतमाता चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. कॉलेजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला, म्हणून ऐनवेळी विजूमामांना नाटकात काम करायला सांगितलं गेलं आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर त्यांनी रंगमंचावर अभिनय केला. नाटक यशस्वी झालं आणि त्यांना, आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा, असं त्यांनी काही ठरवलं नव्हतं. कारण, हे काम त्यांनी कॉलेजमधल्या नाटकात केवळ गरज म्हणून केलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीनं एका यूथ फेस्टिवलमध्ये त्यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवलं. 

भीतीनं 'दरबार'च्या दिग्दर्शकांनी मागितली पोलिस सुरक्षा

त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला. विजय कदम, विजय चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून 'रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरु केली आणि अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे 'टूरटूर' नाटक करत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंनी पुरुषोत्तम बेर्डेंची आणि विजूमामांची ओळख करून दिली आणि विजूमामांच्या देदीप्यमान नाट्यकारकीर्दीला "टूर टूर" नाटकाद्वारे बहारदार प्रारंभ झाला. 

या जबरदस्त कलाकारानं प्रत्येक भूमिका करताना त्या भूमिकेला योग्य न्याय दिला. तू सुखकर्ता, झिलग्यांची खोली, सगळे सभ्य पुरुष, सासरेबुवा जरा जपून, भागम भाग, बाबांची गर्लफ्रेंड, जळूबाई हळू, कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. ५, देखणी बायको दुसऱ्याची, हयवदन, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांमधे त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी' नाटकासाठी निमंत्रण आलं. त्या वेळी विजूमामा मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन दोन-तीन तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील, अर्थात मावशीची भूमिका करून विजूमामांनी अनेक विक्रम केले. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजाराच्यावर प्रयोग सादर झाले. इतकंच नाही तर, "तू तू मी मी" नाटकात त्यांनी एकाच नाटकात चौदा भूमिका साकारण्याचा विक्रमही केला.

पंतप्रधान मोदींनंतर बच्चन यांना ट्विटवर केले जाते सर्वाधिक फॉलो

चित्रपटक्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी चित्रपटसृष्टीचा मोठा कालावधी विजूमामांनी जवळून पाहिला, त्यातील बदल पाहिले आणि त्यात बहुमूल्य योगदानही दिलं. "वहिनीची माया" ह्या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चार दशकांहून अधिक काळ त्यांनी विविधांगी भूमिका केल्या. घोळात घोळ, धुमाकूळ, बलिदान, शेम टू शेम, माहेरची साडी, सासूचं स्वयंवर, बकुळा नामदेव घोटाळे, तुझा नवरा माझी बायको, जत्रा, नाना मामा, मुंबईचा डबेवाला, साली ने केला घोटाळा, भरत आला परत, जबरदस्त, हलाल, चष्मेबहाद्दूर, चल लव्ह कर, वन रुम किचन, लग्नाचा धुमधडाका, शुभमंगल सावधान, झपाटलेला, माझा छकुला, चिमणी पाखरं, थरथराट, 'पछाडलेला, दुभंग, झपाटलेला २, करायला गेलो एक, बायको झाली गायब अशा अनेक चित्रपटांमधून आपल्याला विजूमामा विविध भूमिका साकारताना आणि रसिकांचं मनमुराद निखळ मनोरंजन करताना पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे छोट्या पडद्यावर गाजलेल्या असे पाहुणे येती, रानफूल, लाइफ मेंबर, अफलातून, टोकन नंबर अशा मालिकांमध्येही त्यांनी आपल्या लाजवाब अभिनयाने रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. "अशी असावी सासू" चित्रपटामधल्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, २०१७ साली संस्कृती कलादर्पणचा जीवनगौरव पुरस्कार आणि २०१८ साली चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं.

दिग्दर्शकानं माझ्यावर ओरडण्याची एकही संधी सोडली नाही- हृषिकेश

विविधरंगी भूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणाऱ्या या चतुरस्त्र कलाकाराने, २४ ऑगस्ट २०१८ रोजी जगाच्या रंगभूमीवरून अचानक एक्झिट घेतली आणि विनोदाच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली. अशा या, रसिकांच्या चेहऱ्यावर लिलया हसू उमटवणाऱ्या अवलिया कलाकाराला मानाचा मुजरा...

#नाट्यकर्मीविजू