पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेष : रंगभूमीच्या रंगात रंगलेले कलाकार

(छाया सौजन्य : विजय पटवर्धन/ इन्स्टाग्राम )

सहा दशकं आपल्या खणखणीत आवाजाने आणि स्पष्ट शब्दोच्चाराने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती इथे झाला. त्यांचे वडील, "चिंतामणराव कोल्हटकर" हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. तर, विनोदी साहित्याचे मेरूमणी, "श्रीपाद कृष्ण कोल्हटकर" हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे चुलते. त्यामुळे घरातूनच त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. तो त्यांनी स्वकष्टाने वृद्धिंगत केला आणि ते यशाची शिखरे सहज पादाक्रांत करत गेले. भालजी पेंढारकरांच्या 'गरिबांचे राज्य' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला आणि आपला स्वतः चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. नंतर, 'भावबंधन' नाटकातल्या 'मोरेश्वर' या भूमिकेतून ४ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांचं नाट्यक्षेत्रात पदार्पण झालं.

मकर संक्रांत : 'चला सकारात्मक व्हायरल पसरवूया'

त्यानंतर त्यांच्या रंगभूमीवरच्या दैदिप्यमान कारकिर्दीने वेग घेतला आणि 'एकच प्याला', 'पद्मिनी', 'आग्र्‍याहून सुटका', 'बेबंदशाही', 'इथे ओशाळला मृत्यू',' श्री', 'स्वामिनी', 'दुरिताचे तिमिर जावो', 'आकाशगंगा', 'पंडितराज जगन्नाथ', 'मोहिनी', 'अश्रूंची झाली फुले', 'गारंबीचा बापू', 'बावरली हरिणी', 'विषवृक्षाची छाया', 'नटसम्राट', 'मुद्राराक्षस' अशी अनेक नाटके गाजवत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'आग्र्‍याहून सुटका', 'बेबंदशाही', 'पद्मिनी', 'इथे ओशाळला मृत्यू', अशा अनेक ऐतिहासिक नाटकातल्या त्यांच्या भूमिका तर विशेष गाजल्या. 'एकच प्याला', 'स्वामिनी', 'दुरिताचे तिमिर जावो' नाटकांमधील त्यांनी रंगवलेल्या भूमिका रसिकांच्या मनात कायमच्या रुजल्या आहेत. १९५० साली झळकलेल्या 'कुंकवाचा धनी' या चित्रपटात त्यांना नायकाची व्यक्तिरेखा साकारायची संधी सर्वप्रथम लाभली. त्यात त्यांनी, 'शांताबाई आपटे' यांच्याबरोबर नायकाची भूमिका केली. त्यानंतर 'पेडगांवचे शहाणे', 'शेवग्याच्या शेंगा', 'मोहित्याची मंजुळा', 'हिरवा चुडा', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते', 'जावई माझा भला', 'ही माझी लक्ष्मी', 'अंगाई', 'तू तिथे मी' आदी ८०पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी अप्रतिम भूमिका केल्या.

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक प्रदर्शित

अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केलं. १९६४ सालातलं, 'मोहिनी' हे त्यांनी दिग्दर्शित केलेलं पहिलं नाटक. त्यानंतर त्यांनी अनेक उत्तमोत्तम नाटकांचं दिग्दर्शन केलं. त्यांना चित्रपटातील आणि नाटकांतील उत्कृष्ठ अभिनयासाठी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. त्यात, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.

१९८७ साली इंदुरमधे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद कोल्हटकरांनी भूषवलं होतं. तसंच, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या "पुणे" शाखेचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं. तर संस्कार भारतीचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविलं होतं. कोल्हटकरांनी लिहिलेलं, "रंगात रंगलो मी" हे, आत्मकथनात्मक पुस्तक प्रसिध्द आहे. २५ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी जगाच्या रंगभूमीचा कायमचा निरोप घेतला. पण त्यांनी अजरामर केलेल्या व्यक्तिरेखांमधून ते अजूनही रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. अशा या खणखणीत आवाजाच्या दिग्गज अभिनेत्याला मानाचा मुजरा...

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये हा ज्येष्ठ अभिनेता वडिलांच्या भूमिकेत