पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अंधाधून'ची चीनमध्ये बक्कळ कमाई, कमावला ३०० कोटींचा गल्ला

अंधाधून

चीनमध्ये भारतीय चित्रपटांना मोठी पसंती मिळताना दिसून येत आहे.  चिनी चित्रपटगृहात हॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाची संख्या कमी केल्यानं बॉलिवूड चित्रपटांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.  गेल्या दोन वर्षांत बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांनी चीनमध्ये बक्कळ कमाई केली आहे. यात आता आयुषमान खुरानाच्या 'अंधाधून' चित्रपटाचाही समावेश झाला आहे. या चित्रपटानं तब्बल ३०० कोटींचा गल्ला जमवाला आहे. 

आयुषमानचा 'अंधाधून' गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०१८ मधला सुपरहिट चित्रपट ठरला होता. गेल्याच महिन्यात तो चीनमध्येही प्रदर्शित करण्यात आला. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट होता. 'पिआनो प्लेअर' या नावानं प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत ३०० कोटींचा गल्ला जमवाला आहे. पहिल्या पाच दिवसात ‘अंधाधून’ने चीनमध्ये ९५. ३८ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात ही कमाई १५० कोटींवर पोहोचली. आता ३०० कोटींची कमाई करून आयुषमानचा 'अंधाधून' हा चित्रपट चीनमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला आहे. 

 

मर्डर मिस्ट्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला चिनी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतल्याचं पहायला मिळत आहे. चीनमधली 'अंधाधून'ची कमाई ही भारतातील कमाईपेक्षाही चौपट आहे. आतापर्यंत चीनमध्ये आमिर खानच्या चित्रपटांना पसंती मिळाल्याचं दिसून येत होतं आता मात्र वेगळ्या विषयांचे भारतीय चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहेत. 

गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक कमाई केलेले भारतीय चित्रपट
१. दंगल - आमिर खान
२. सिक्रेट सुपरस्टार - आमिर खान
३. अंधाधून- आयुषमान खुराना
४. बजरंगी भाईजान- सलमान खान
५. हिंदी मिडीअम- इरफान खान