पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतिदिन विशेष : 'आनंदयात्री सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला'

आनंद अभ्यंकर

देवाला ज्याप्रमाणे आपण अनेक विशेषणांनी संबोधतो त्याच प्रमाणे मराठी नाट्य चित्रपट सृष्टीत एका अजातशत्रूला सच्चा मित्र, प्रेमळ सखा, लाडका सोबती, मायाळू भाऊ, उत्तम वाटाड्या, चाणाक्ष मार्गदर्शक, अशा अनेक विशेषणांनी ओळखलं जातं. तो म्हणजे उत्कृष्ट लेखक, अप्रतिम अभिनेता आणि तितकाच आपलासा आणि आपल्यातलाच वाटणारा 'खरा माणूस' 'आनंद अभ्यंकर'.

गिरीश- सयाजींची 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'

 २ जून १९६३ ला ह्या अवलियाचा जन्म झाला. शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झालं आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्यात आला. गरवारे महाविद्यालयात त्याने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्याने व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षणही घेतलं. काही काळ बजाज ऑटोमध्ये नोकरीसुद्धा केली. पणशाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून आणि छोट्या-छोट्या नाटकांमधून कामं केलेला त्याच्यातला कलाकार, त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. आराधना नाट्यसंघ या हौशी नाट्य संस्थेच्या अनेक नाटकांमधे त्याने कामं केली. खऱ्याअर्थानी त्याच्या नाट्य प्रवासाला सुरुवात झाली ती ‘कुर्यात सदा टिंगलम्’ या त्याच्या पहिल्या नाटकाने. त्यानंतर तो मुंबईत आला आणि सगळ्यांचा लाडका 'आंड्या' झाला. त्यानंतर त्याने मागे वळून कधी बघितलंच नाही. 

मा आनंद शीलानं बायोपिकसाठी प्रियांकाला नाकारले, आलियाला दिली परवानगी

भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, मधली त्याची भूमिका विशेष गाजली. 'चॉइस इज युवर्स', 'धन धना धन', 'असामी असामी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'झोपा आता गुपचूप' , अशा अनेक नाटकांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या. 'वादळवाट', 'असंभव', 'फू बाई फू', 'शुभंकरोती', 'या गोजिरवाण्या घरात', 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'मला सासू हवी', 'अनोळखी' आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांवरच्या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात आणि रसिकांच्या मनामनात पोहोचला. तर 'वास्तव', 'जिस देश में गंगा रहता हैं', 'अकलेचे कांदे', 'तेरा मेरा साथ रहें', 'मातीच्या चुली', 'चेकमेट, 'कुंकू लावते माहेरचं', 'ही पोरगी कोणाची', 'पप्पू कांट डान्स साला', 'आनंदाचे झाड', 'आयडियाची कल्पना', 'जन्म', 'बालगंधर्व', 'स्पंदनअशा' अनेक चित्रपटांतही त्याने अविस्मरणीय भूमिका केल्या. 

भावालाही मुख्य भूमिका मिळायला हवी, आयुष्मानची इच्छा

फक्त उत्तम अभिनेताच नाही, तर तो प्रतिभावान लेखकही होता. अनेक उत्तमोत्तम मालिकांचं लेखनही त्याने केले. मोहन जोशी, अशोक शिंदे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री या जग्न्मित्राच्या, मित्र परिवाराची नावं घ्यावी तेव्हढी कमीच आहेत. सगळ्यांच्या प्रत्येक अडी अडचणीला आपुलकीने धाऊन येऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा हा आनंदयात्री २३ डिसेंबर २०१२ ला मात्र सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला. आनंद या आपल्या नावाप्रमाणेच आपल्या असण्याने समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा हा अजातशत्रू, आत्ता जगात नसला तरी प्रत्येकाच्या मनात कायम घर करुन राहिला आहे. मित्रा तुला खरंच मनापासून मानाचा मुजरा....