पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NYIFF मध्ये 'पाणी' चित्रपटासाठी आदिनाथ कोठारेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

पाणी

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आदिनाथ कोठारेच्या 'पाणी' चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकताच १९ वा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्ह पार  पडला.  न्यूयॉर्कमधील व्हिलेज इस्ट येथे ११मे रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. प्रियांका चोप्राची निर्मिती आणि आदिनाथचं दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं. आदिनाथचा १३ मेला वाढदिवस असतो, वाढदिवसाची याहून सुंदर भेट ती कोणती असं लिहित आदिनाथनं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. 

प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल' या निर्मिती कंपनीअंर्तगत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. अभिनयात आपली ओळख निर्माण करणाऱ्या आदिनाथनं या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं.  पाण्याच्या भीषण समस्येवर प्रकाश टाकणारा ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाड्यातील सत्य घटनेवर आधारित आहे. नगरवाडीमधल्या एका व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यानं एकही मुलगी या गावात लग्न करायला तयार होत नाही. त्यामुळे नायकाचं लग्न जुळण्यासही अडचणी येत असतात अशा वेळी गावातील पाण्याचा प्रश्न तो कसा सोडवतो हे चित्रपटात पाहायला मिळतं.

या चित्रपटाची दखल न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये घेतली याचा  आनंद आदिनाथनं व्यक्त केला आहे. महेश कोठारे यांच्या 'धडाकेबाज ' मनोरंजक चित्रपटाचा मार्ग न अवलंबता आदिनाथने आपली एक स्वतंत्र वाटचाल सुरु केली आहे. आदिनाथला सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर  निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आनंद व्यक्त केला आहे.