Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा 'स्थळ'; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा 'स्थळ'; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?

Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा 'स्थळ'; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?

HT Marathi Desk HT Marathi
Updated Feb 18, 2025 10:31 AM IST

Sthal Marathi Movie Trailer : अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे.

Sthal Marathi Movie Trailer
Sthal Marathi Movie Trailer

Sthal Marathi Movie Trailer : अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट असलेल्या स्थळ या चित्रपटाचा टीजर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित "स्थळ" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबई येथील लॉ कॉलेज येथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील मुख्याध्यापक उपस्थित मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाची रंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून, ७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी, शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचं तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे. त्याशिवाय स्त्री सशक्तीकरण, प्रथा-परंपरा हेही मुद्दे चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवतं. या पूर्वी चित्रपटाचा टीजर आणि "पाहुणे येत आहेत पोरी..." हे गाणं लाँच करण्यात आलं होतं. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटाचा रंजक ट्रेलर समोर आल्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेलेला, पुरस्कारप्राप्त असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी "स्थळ" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. . अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट "स्थळ" या चित्रपटातून दाखवली जाणार आहे., महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी 'स्थळ' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner