मराठी चित्रपटसृष्टीमधील एनर्जेटीक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधव ओळखला जातो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट तुफान हिट होताना दिसतो. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो नव्या कारची पूजा करताना दिसत आहे. पण ही कार स्वत: सिद्धार्थने खरेदी केलेली नाही. त्याला बक्षिस म्हणून ही कार भेट देण्यात आली आहे.
सिद्धार्थ जाधवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थने त्याच्या नवीन गाडीनिमित्त हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ निळ्या रंगाच्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. ही गाडी सिद्धार्थला स्टार प्रवाह वाहिनीकडून भेट म्हणून मिळाली आहे. स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमानिमित्त त्याला ही कार मिळाली असून त्याने गाडीचा खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहे.
सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी आणि मुलगी देखील पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “आज न मागताच खूप काही मिळाले आहे. मराठी टेलिव्हीजनच्या इतिहासातला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी भावना आहेत. खूप मस्त वाटतं आहे” सिद्धार्थने असे कॅप्शन दिले आहे.
पुढे तो म्हणाला, “खूप वर्षांपूर्वी “इंडियन आयडॉल” च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती. ते बघून खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर “आता होऊ दे धिंगाणा” सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे.”
वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते माहिती आहे का?
सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. तसंच सिद्धार्थच्या लेकी इरा व स्वरा याही गाडी बघून आनंदी झाल्या आहेत. नवीन गाडीनिमित्त त्यांनी केकही कट केला आहे.