नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे समोर आले. आता यावर निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरआरआर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऑस्कर मिळताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 'आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला. या श्रेणीत भारताला पहिल्यांदाच ऑस्कर मिळवून देणारा हा पहिला वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट ठरला आहे. या क्षणाचे वर्णन शब्दात करता येणार नाही. आमच्या जगभरातील चाहत्यांना हे समर्पित आहे. धन्यवाद' या आशयाचे ट्वीट करत निर्मात्यांनी आभार मानले आहेत.
वाचा: ‘या’ चित्रपटाने जिंकला ऑस्कर २०२३ पुरस्कार, वाचा विजेत्यांची यादी
एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे. त्यांच्या या गाण्याने आता ऑस्कर जिंकत सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.
यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.