बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला उष्माघात आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने शाहरुख खानला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि जवळची मैत्रीण जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांनीही शाहरुखच्या तब्येतीची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली होती.
यावेळी शाहरुख खान याच्या तब्येतीची माहिती देताना जुही चावला हिने चाहत्यांना आश्वासन दिले होते की, ‘शाहरुख खूप चांगली रिकव्हरी करत आहे आणि रविवारी आयपीएल फायनलमध्ये केकेआरला पाठिंबा देण्यासाठी परत मैदानावर येईल. काल रात्री शाहरुखला बरं वाटत नव्हतं, पण त्याच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले आणि आता त्याला बरं वाटत आहे. देवाची इच्छा असेल, तर तो लवकरच उठेल आणि वीकेंडला स्टँडवर उभा राहून संघाचा उत्साह वाढवेल.'
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यातील आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यासाठी अभिनेता शाहरुख खान दोन दिवस अहमदाबादमध्ये होता. किंग खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, धाकटा मुलगा अबराम आणि मॅनेजर पूजा ददलानी देखील उपस्थित होते. केकेआरची सहमालक जुही चावला आणि जय मेहता यांच्यासोबत सुहाना तिच्या जवळच्या मैत्रिणी अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि केकेआर टीमचा उत्साह वाढवत होते. केकेआरने मंगळवारी क्वालिफायर १ मध्ये सनरायझर्स हैदराबादवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवत चौथ्याआयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला. केकेआरचा अंतिम सामना रविवारी चेन्नईत होणार आहे.
अहमदाबादयेथे मंगळवारी ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारी ते ४५.९ अंशांपर्यंत वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांत ५८ वर्षीय अभिनेता शाहरुख खान याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु, प्रत्येक वेळी त्याने आपल्या मजबूत फिटनेसमुळे नेहमीच पुनरागमन केले आहे. 'रा वन'च्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते.
‘हॅप्पी न्यू इयर’ या २०१४मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखचा सेटवर किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होते. तर, २०१६मध्ये ‘फॅन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख खानच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात ‘डर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. तर, १९९७मध्ये आलेल्या ‘कोयला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या गुडघ्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले होते. ‘माय नेम इज खान' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या अभिनेत्याच्या डाव्या खांद्यावर आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
संबंधित बातम्या