Sridevi Prasanna Movie Review : सध्या मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून एक धमाल कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता तुम्ही देखील वीकेंड सुट्टीचा विचार करून हा चित्रपट बघायला जाण्याचा विचार करत असाल, तर हा चित्रपट कसा आहे ते नक्की वाचा.
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा पुरेपूर विडा या चित्रपटाने उचलला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात पुन्हा एकदा गाव आणि शहर असं एक कथानक मिश्रण पाहायला मिळाले आहे. गावची ‘श्रीदेवी’ आणि मुंबईतला ‘प्रसन्न’ यांची ही कथा या चित्रपटातून पाहायला मिळाली आहे. या चित्रपटातून कोकण आणि गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले आहे. चित्रपटाचे नायक आणि नायिका दोघेही शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात चांगले नाव कमावत आहेत. आता त्यांची एकमेकांशी जमलेली जोडी प्रेक्षकांना खुर्वीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.
गावात जन्मलेली, तिथेच शिक्षण घेतलेली आणि नोकरी करणारी तरुण पिढी आणि शहरातील तरुणाई यात असलेला फरक आता तसा फारसा जाणवत नाही. मात्र, आजही शहरातील तरुण आणि ग्रामीण भागातील तरुण यांच्यातील पूर्वापार चालत आलेला समजुतीचा पायंडा आजही दिसून येतो. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची नायिका श्रीदेवी हिचा जन्म वेंगुर्ल्यात झाला आहे. श्रीदेवीचे शिक्षण देखील वेंगुल्र्यात झाले आहे. कुटुंबासोबत तिथेच राहून कुडाळच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे. तर, प्रसन्न अगदी तिच्या विरुद्ध आहे. प्रसन्न हा मुंबईत जन्मलेला, इथेच वाढलेला आयटी क्षेत्रात काम करणारा मुलगा आहे.
श्रीदेवी गावात वाढलेली असलेली तरी तिचं कुटुंब खूप मॉर्डन आहे. तिच्या घरातील सगळ्यांचे प्रेमविवाह झालेले आहेत. त्यामुळे तिच्या कुटुंबाला पण वाटतं की, श्रीदेवीने देखील प्रेमविवाह करावा. मात्र, प्रेमात पडावं असं कुणी तिला भेटलंच नाही. तर, श्रीदेवीच्या अगदी विरुद्ध प्रसन्न आहे. प्रसन्नच्या आयुष्यात चार मुली येऊन गेल्या. मात्र, त्याला लग्न करण्याची काही इच्छा नाही. आता श्रीदेवी आणि प्रसन्न एका ऑनलाईन मॅट्रीमोनियल साईटवरून भेट होते. अर्थात पहिल्या भेटीत प्रसन्न टिपिकल मुंबईतल्या तरुणाने एखाद्या गावातील मुलीला प्रश्न विचारावेत तसेच विचारतो.
पहिल्याच भेटीत त्यांच्यात हा शाब्दिक दुरावा निर्माण होतो. पुढे ते एकमेकांच्या जवळ येऊन देखील एकमेकांपासून दूर राहतात. आता दोघांमध्ये नेमकं काय घडतं, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावंच लागेल.
चित्रपटातील पात्ररचना आणि त्यासाठी झालेली कलाकारांची निवड यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट खरोखरच बघण्यासारखा आहे. सिध्दार्थ चांदेकर, सई ताम्हणकर या दोघांच्याही दमदार अभिनयामुळे ‘श्रीदेवी प्रसन्न’ची गोष्ट खऱ्या अर्थाने रंगली आहे. त्यांच्यासोबतच सुलभा आर्य, संजय मोने, समीर खांडेकर, शुभांगी गोखले असे एकाहून एक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. सगळ्याच बाजूंनी हा चित्रपट एकदा नक्की पाहावा असा आहे.