Squid Game Season 2 Release Date : सध्या प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे वाढताना दिसत आहे.ओटीटीवर अनेक कोरियन शो आहेत, ज्यांनी मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. परंतु, या सगळ्यांमध्ये ‘स्क्विड गेम’ ही सीरिज वेगळी ठरत आहे. या वेब सीरिजला जगभरातून प्रचंड प्रेम मिळाले. त्यामुळेच प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या या प्रतिक्षेला आता पूर्णविराम देत ‘स्क्विड गेम’च्या मेकर्सनी या सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सवर याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
२०२१मध्ये रिलीज झालेल्या या कोरियन थ्रिलर शोमध्ये मृत्यूचा खेळ दाखवण्यात आला आहे. शोचा मुख्य अभिनेता ली जंग जे याला ड्रामा सीरिजमधील लीड कॅरेक्टरसाठी एमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.स्क्विड गेम ही कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांची कथा आहे, जे लहान मुलांच्या खेळात मोठ्या प्रमाणात पैसे जिंकण्यासाठी स्पर्धा करतात. पण, या खेळात जो हरतो त्याच्यासाठी मृत्यू हा शेवटचा पर्याय असतो. ‘स्क्विड गेम सीझन२’मध्ये दाखवले जाणार आहे की, नायक जी-हान अमेरिकेला जाण्याची त्याची योजना सोडून देतो आणि त्याऐवजी एका मोठ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो.
या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही काही जुने चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, गोंग यू आणि वाई हा-जून यांचा समावेश आहे. तर, नवीन कलाकारांमध्येयिम सी-वान, कांग हा-न्युल, पार्क ग्यू-यंग, पार्क सुंग-हुन, जो यू-री, यांग डोंग-गेन, कांग ए-सिम, ली डेव्हिड, ली जिन-उक, चोई सेंग-ह्यून, रोह जे-वॉनआणिवॉन जी–अनहे चेहरे ‘स्क्विड गेम सीझन२’मध्ये झळकणार आहेत.
‘स्क्विड गेम सीझन२’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर२६ डिसेंबर २०२४पासून प्रसारित होणार आहे.या आधी २०२१मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.आता त्याचा दुसरा सीझन तीन वर्षांनी रिलीज होण्याच्या तयारीत आहे.या शोच्या दुसऱ्या सीझनच्या कलाकारांचे काही फोटो देखील समोर आले आहेत. यामध्ये जी-हान, फ्रंट मॅन (ली ब्युंग-हुन) आणि रिक्रूटर (गॉन्ग यू) परतताना दिसले आहेत. पार्क ग्यु-यंगचे नवीन पात्र देखील दिसत आहे.