Squid Game Actor Oh Yeong-su Arrest: प्रसिद्ध कोरियन वेब सीरिज 'स्क्विड गेम'मध्ये ‘नंबर १’ खेळाडूच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता ओ यंग सु याला पोलिसांनी अटक केली आहे. साऊथ कोरियन अभिनेता लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळला आहे. २०२१मध्ये अभिनेता ओ यंग सु ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आला होता. या सीरिजमध्ये ‘ओह इल’ असे त्याच्या पात्राचे नाव होते. या सीरिजमधील भूमिकेसाठी ओ यंग सु याला गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला होता. मात्र, एका महिलेने त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्याने आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
७९ वर्षीय अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि चौकशी सुरू झाली होती. तथापि, अभिनेत्याने त्याच्यावरील आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले होते. मात्र, पुन्हा तपास सुरू होताच त्याच्या नावाच्या सर्व जाहीराती देखील काढून टाकण्यात आल्या. १५ मार्च २०२४ रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली यात, सुवॉन जिल्हा न्यायालयाच्या सेओंगनाम शाखेने अभिनेत्याला दोषी ठरवले. अभिनेत्याविरोधात हे प्रकरण २०१७पासुन सुरू आहे. जुन्या तक्रारीनुसार, ओह याच्यावर २०१७मध्ये डेगूमधील एका महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आणि तिच्या गालावर जबरदस्ती चुंबन घेतल्याचा आरोप होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर अभिनेत्याला ८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १५ मार्च रोजी साऊथ कोरियाच्या न्यायालयाने त्याला ८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. याशिवाय न्यायालयाने त्याला लैंगिक हिंसाचार रिहॅब क्लासला ४० तास उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने पीडितेचे दावे खरे असल्याचे मानले आणि शिक्षेची घोषणा केली आहे.
अभिनेता ओ यंग सु याची ‘स्क्विड गेम’ ही वेब सीरिज २०२१मध्ये आली होती. या वेब सीरिजला एका महिन्यात ११ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. या सीरिजने खळबळ उडवून दिली होती. या वेब सीरिजसाठी अभिनेता ओ यंग सु याला २०२२मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अभिनेता ओ यंग सु अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये झळकला आहे. अभिनेत्याला 'प्राइम टाइम एमी' पुरस्कार आणि ‘नॅशनल थिएटर असोसिएशन ऑफ कोरिया’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.