Spruha Joshi Talks About her Photoshoot: बॉलिवूड असो वा मराठी मनोरंजन विश्व अनेकदा कपड्यांमुळे सेलिब्रिटी ट्रोल होत असतात. अनेकदा कलाकार त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या प्रतिमांमध्ये अशाप्रकारे अडकतात की, त्यांनी इतर काहीही केलं तरी चाहते आणि प्रेक्षक त्यांना ट्रोल करू लागतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्यासोबत घडला होता. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने एका बॅकलेस स्टाईल ब्लाऊजमध्ये फोटोशूट केले होते. या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता अनेक वर्षांनंतर स्पृहा जोशी हिने या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट जर खटकली तर, चाहते थेट बोलून दाखवतात किंवा ट्रोलही करतात. अशाच ट्रोलिंगमध्ये स्पृहा जोशी अडकली होती. काही वर्षांपूर्वी स्पृहा जोशी हिने एक सुंदर बोल्ड फोटोशूट केले होते. मात्र, तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. याच फोटोशूटमुळे स्पृहा जोशी ट्रोल देखील झाली होती. मराठी मनोरंजन विश्वात स्पृहा जोशीची एक वेगळी प्रतिमा आहे. अतिशय साधी भोळी आणि चरित्र भूमिका साकारणारी अभिनेत्री अशी स्पृहाची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळे तिचे बोल्ड फोटोशूट काही चाहत्यांना रुचले नाही. त्यांनी लगेचच तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती.
नुकतीच स्पृहा जोशी हिने एका प्रसिद्ध वेब पोर्टलला मुलाखत दिली. यात तिने आपल्या त्या फोटोशूटवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत स्पृहा जोशीला तिच्या वादंग माजवलेल्या या फोटोशूटवर प्रश्न विचारण्यात आला. स्पृहाला हे फोटोशूट का करावं वाटलं, हे सांगताना ती म्हणाली की, ‘त्या फोटोशूटला आता पाच-सहा वर्ष झाली आहेत. ते फोटोशूट फार काही अंगप्रदर्शन करणारं नव्हतं. त्यात मी हॉल्टरनेक ब्लाऊज घातला होता. याआधी कुणी असा ब्लाऊज घातला नाही, असं नाही. या आधीपण अनेकांनी असे फोटोशूट केले होते. त्यात काही नवल नाही.’
पुढे स्पृहा जोशी म्हणाली की, ‘प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कलाकार ज्या भूमिका पडद्यावर साकारतात, तो केवळ अभिनय असतो. खऱ्या आयुष्यात कलाकार तसे नसतात. आणि त्या व्यक्तीने भूमिकेसारखं असावं, असं प्रेक्षकांनी गृहीत धरू नये. कारण जर कलाकार एकाच भूमिकेत अडकला तर प्रेक्षक आणि तो स्वतः देखील कंटाळून जाईल.’