अभिनय आणि सौंदर्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. तसेच तिच्या संवेदनशील कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. सध्या स्पृहा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिचे बऱ्याच दिवसांनंतर 'शक्तीमान' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. तिच्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. आता स्पृहाने तिच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्पृहा सध्या मालिका आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. मोजके पण लक्षात राहील असे काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्पृहाचे नाव घेतले जाते. त्यामुळे ती मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची प्रतीक्षा संपली असून शक्तीमान या सिनेमातून स्पृहा नवी भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता या चित्रपटाच्या निमित्ताने तिने तिच्या आयुष्यातील सुपरहिरो विषयी सांगितले आहे.
वाचा: 'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट
'शक्तीमान' या चित्रपटात “तुला सुपरहिरो व्हायचे आहे ना… हो की, पण तुला आठवण करून देते की सुपरहिरोला बायको नसते ,” असा एक संवाद स्पृहाच्या तोंडी आहे. नवऱ्याला वास्तवाची जाणीव करून देणारे स्पृहाचे हे वाक्य सध्या खूपच व्हायरल झाले आहे. प्रत्येक मुलासाठी त्याचे पालक हे त्याच्यासाठी सुपरहिरो असतात. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या स्पृहाच्या आयुष्यात असं सुपरहिरो कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांनाही आहे.
वाचा: नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर
शक्तीमान या सिनेमातील छोट्या ईशानसाठी त्याचे बाबा सुपरहिरो व्हावेत असे वाटते, त्यांच्याकडून त्याला काहीतरी संदेश घ्यावा असे वाटते. स्पृहाच्या आयुष्यातही असे सुपरहिरो आहेत आणि ते म्हणजे तिचे आईबाबा. या दोन्ही सुपरहिरोंनी आयुष्याकडे पाहण्याचा जो सकारात्मक भाव दिला तो कमाल असल्याचे स्पृहा सांगते. स्पृहाच्या मध्यमवर्गीय कुटुंबात येणारी व्यक्ती, नातेवाईक, पाहुणे परत जाताना खुश होऊन जातात. पहिल्या पावसात भिजायचेच असा नियम असलेल्या तिच्या घरात आईबाबा दर पावसाळ्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद द्यायचे. रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंद कसे मिळवायचे हे सांगणारे आईवडील स्पृहासाठी तिचे सुपरहिरो आहेत असं ती सांगते.
Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर
हृदयाचा आजार असलेल्या एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या नवऱ्याची बायको अशी स्पृहाची या सिनेमात भूमिका आहे. मदत करायला तिचा विरोध नाही, पण या मदतीच्या धावपळीत नवऱ्याचे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तिला मान्य नाही. आदिनाथ कोठारेसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या स्पृहाने या सिनेमातील सुपरहिरो बनू पाहणाऱ्या नवऱ्याची बायको साकारली आहे.शक्तीमान हा सिनेमा २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, ईशान कुंटे आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
संबंधित बातम्या