कलर्स मराठीवरील 'सुख कळले' ही मालिका पाहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिने मिथिला हे पात्र साकारला आहे. मालिकेत माधवच्या निधनानंतर मिथिलाला धक्का बसला आहे. आता मालिकेत एक नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. आता या कलाकाराच्या एण्ट्रीने मालिका कोणत्या वळणावर पोहोचणार हे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
माधवच्या आकस्मिक निधनाने मिथिला कोलमडलीय खरी पण आपल्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलल्याशिवाय गत्यंतर नाही हे तिला माहिती आहे. अनेक आव्हानं आता तिच्यासमोर आहेत पण मिथिलाला आता खंबीर व्हावेच लागणार आहे. एकीकडे आपल्या दुःखाचा सामना करत ती कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आता तिला घराबाहेर पडावे लागणार आहे. १० वर्षे गृहिणीची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता मिथिला आयुष्याच्या या कसोटीच्या काळात पुन्हा नव्याने कामावर रूजू होण्यासाठी सज्ज होणार आहे.
वाचा: गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण
दुसरीकडे बाईने घरच सांभाळावे, तिनं कामासाठी बाहेर पडू नये, अशी विमल आत्याची विचारसरणी असल्याने मिथिलाला सगळ्या कसोट्यांवर परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. येत्या भागात मिथिला हे सगळं कसं सांभाळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष
'सुख कळले' या लोकप्रिय मालिकेत आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवीन रंजक वळण येणार आहे. सौमित्रचे साधेपण, मनमिळावू स्वभाव आणि मदतीची वृत्ती मिथिलाच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे दिसून येत आहे. सौमित्रला कवितांचा शौक आहे आणि त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा खरेपणा आहे. ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करेल. हसमुख, मदत करणारा आणि इतरांच्या भावना समजून घेणारा सौमित्रचा स्वभाव आहे. पैशापेक्षा संबंधांना अधिक महत्त्व देणाऱ्या सौमित्रच्या व्यक्तिमत्त्वामुळे कथा आणखी रंगतदार होईल.
वाचा: प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये
'सुख कळले' मालिकेत पुढे काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सौमित्रच्या प्रवेशाने मालिकेत नवी उर्जा आणि नवे वळण आले असून अभिनेता आशय कुलकर्णीच्या उत्कृष्ट अभिनयामुळे सौमित्रची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
संबंधित बातम्या