Actress Soumya Shetty Arrested: साऊथ अभिनेत्री सौम्या शेट्टी हिला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. सौम्या शेट्टीला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सौम्या शेट्टीवर सोने चोरीचा आरोप आहे. सौम्या शेट्टीने तिच्या एका मैत्रिणीच्या घरातून तब्बल एक किलोहून अधिक सोने चोरल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी सौम्या शेट्टीविरोधात एफआयआर दाखल करून, तिला अटक केली आहे. सौम्या शेट्टीला अटक होताच तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यातच तिला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने सगळेच हैराण झाले आहेत.
अभिनेत्री सौम्या शेट्टी हिने तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या घरातच चोरी केल्याचे समोर आले आहे. भारतीय टपाल विभागाचे निवृत्त कर्मचारी प्रसाद बाबू यांनी त्यांच्या घरातून एक किलोपेक्षा जास्त सोने चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर पोलिसांनी सौम्या शेट्टीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सौम्या शेट्टी हिचे प्रसाद बाबू यांच्या घरी येणे-जाणे असायचे. तक्रार दाखल करणाऱ्या प्रसाद बाबू यांची मुलगी मोनिका ही सौम्या शेट्टीची खास जवळची मैत्रीण होती.
प्रसाद बाबूची यांची मुलगी आणि सौम्याची मैत्रीण मोनिका अतिशय विलासी आयुष्य जगात होती. तिच्या याच लाईफस्टाईलचा सौम्याला हेवा वाटत होता. सौम्या शेट्टीने मोनिकाची जीवनशैली पाहिली आणि तिची नियत बिघडली. सौम्या शेट्टी बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने अनेकदा मोनिकाच्या बेडरूममध्ये जायची. अशाच एका दिवशी संधी मिळताच तिने सोन्याची चोरी केली. मोनिकाचे कुटुंबीय त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेले असता, सौम्याने संधी साधली. मोनिकाचे कुटुंब घरी परतल्यावर त्यांना या चोरीबद्दल कळाले.
प्रसाद बाबू यांनी चोरीची तक्रार केल्यानंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले आणि काही लोकांची संशयित म्हणून चौकशी देखील करण्यात आली. या लोकांमध्ये सौम्या शेट्टीचाही समावेश होता. चोरी करून सौम्या शेट्टी गोव्याला रवाना झाली होती. गोव्यात जाऊन ती ऐशोआरामाचे जीवन जगत होती. पोलिसांनी चौकशी करताच सौम्या शेट्टीने चोरी केल्याची कबुली दिली. सौम्या शेट्टीकडून पोलिसांनी काही सोने जप्त केले आहे. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. सौम्या शेट्टी ही सोशल मीडिया इन्फ़्लुएन्सर आणि तेलूगु इंडस्ट्रीतील ज्युनिअर अभिनेत्री आहे. तिने काही साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.