Hemant Dhome: हेमंत ढोमेच्या फकाट सिनेमात 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एण्ट्री
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hemant Dhome: हेमंत ढोमेच्या फकाट सिनेमात 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एण्ट्री

Hemant Dhome: हेमंत ढोमेच्या फकाट सिनेमात 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एण्ट्री

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 10, 2023 12:56 PM IST

Phakaat Movie: काही दिवसांपूर्वी फकाट या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आता या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता दिसणार असल्याचे समोर आले आहे.

Phakaat Movie
Phakaat Movie

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या चित्रपटात अभिनेता हेमंत ढोमेसोबत दाक्षिणात्य अभिनेता दिसणार असल्याचे समोर आले आहे.

तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची आणि दर्जेदार अभिनयाची छाप पाडणारा कबीर दुहान सिंग आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो दहशतवाद्याच्या भूमिकेत असून त्याचा हा रांगडेपणा आता मराठी प्रेक्षकांनाही अनुभवयाला मिळणार आहे. विविध भाषांमध्ये काम केल्यानंतर कबीरला मराठी चित्रपटात काम करायचे होते आणि त्याची ही इच्छा 'फकाट'च्या निमित्ताने पूर्ण झाली आहे.
वाचा: माय बेबी...; तुरुंगातून सुकेशने पुन्हा लिहिले जॅकलिन फर्नांडिसला पत्र

कबीर दुहान सिंगच्या निवडीबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, '' चित्रपटातील व्हिलन हा पाकिस्तानी दहशदवादी आहे. त्यामुळे साहजिकच त्याचे हिंदीवर प्रभुत्व असणं आवश्यक होतं आणि कबीर दुहान सिंगची हिंदी भाषा खूप शुद्ध आहे. याशिवाय साऊथमधील तो एक नावाजलेला चेहरा आहे. मुळात त्याने वेगवेगळ्या प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता मराठी चित्रपटात अभिनय करण्याची त्याची इच्छा होती. या भूमिकेच्या शोधात असतानाच योग्य वेळी योग्य निवड या भूमिकेसाठी झाली. कबिरचे व्यक्तिमत्व भारदस्त असल्याने त्याचा पडद्यावरील वावर अतिशय प्रभावशाली असतो. चित्रपटातील व्हिलन हा नेहमीच त्या व्यक्तिरेखेला साजेसा असावा आणि कबीर या भूमिकेत चपखल बसतो. हीच कारणं होती, या भूमिकेसाठी कबीरची निवड करण्यासाठी.''

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित 'फकाट' हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपट हेमंत ढोमे, सुयोग्य गोऱ्हे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner