DMDK Chief Vijayakanth Death: साऊथचे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांचे आज (२८ डिसेंबर) निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने चेन्नईतील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विजयकांत यांना चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या राजकारणातही कोरोनामुळे खळबळ माजली आहे. डीएमडीकेचे अर्थात देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम या पक्षाचे संस्थापक विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
डीएमडीकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तर, रुग्णालयाने देखील या बातमीची पुष्टी केली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये विजयकांत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खोकला आणि घसादुखीमुळे गेले १४ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली याच रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकारणच नव्हे, तर विजयकांत यांची फिल्मी कारकीर्द देखील शानदार होती. त्यांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १५४ चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटानंतर तर राजकारणाच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी 'डीएमडीके'ची स्थापना केली. विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोनदा विधानसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.
संबंधित बातम्या