महाराष्ट्रातील नव्या दमाच्या युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, संगीताचा 'सुरेल' नजराणा रसिकांना देणारा 'सुपरस्टार सिंगर' हा नवा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. सोनीच्या हिंदी वाहिनीवरील ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमाच्या तीनही सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर रंगणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक आकर्षक प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे नव्या मराठी संगीत पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तसेच हा शोमध्ये कसे सहभागी होणार हे देखील जाणून घ्या..
‘ताल, लय आणि सूर यांची बहारदार मैफिल रंगणार कारण, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा! अशी टॅग लाईन आलेल्या सुपरस्टार सिंगर या धमाकेदार कार्यक्रमाची लवकरच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या द्वारे सदाबहार गाण्यांची सुरेल पर्वणी महाराष्ट्राच्या रसिकांना मिळणार आहे. तसेच या शोमध्ये सहभागी कसे व्हावे असा प्रश्न देखील पडला आहे. चला जाणून घेऊया या कार्यक्रमाचे ऑडिशन कसे द्यावे?
'सुपरस्टार सिंगर' या कार्यक्रमाद्वारे एक नवा आश्वासक सूर शोधण्याचा प्रवास १० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. २४ ऑगस्टपर्यंत स्पर्धेच्या ऑडिशन्स सुरु राहणार आहेत. याकरीता ५ ते ३० हा वयोगट असणार आहे. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत रंगणार आहे सूरांचे अद्वितीय पर्व. या ऑडिशन्स तुम्हाला सोनी लिव्हवर पाठवता येणार आहेत.
वाचा : 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय', अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला
संगीत क्षेत्रातील दिग्गज परिक्षक, अनुभवी मार्गदर्शक यांना सोबत घेऊन ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमाचा सूरमयी प्रवास सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार? असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे. 'सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. तुमच्या गाण्याच्या प्रतिभेला हवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला. १० ऑगस्टपासून ते २४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही सोनी लिव्ह या https://www.sonyliv.com/dplnk?schema=sony://ems/4/141/0 या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.