Sonu Nigam Viral Video : बॉलिवूड गायक सोनू निगम आपले मत लोकांसमोर अतिशय मोकळेपणाने आणि बेधडकपणे मांडतो. आता पुन्हा एकदा सोनू निगम याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम याने पद्म पुरस्कार २०२५ बाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, किशोर कुमार, अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांसारख्या मोठ्या गायकांना आतापर्यंत पद्म पुरस्कार का मिळालेला नाही? याशिवाय सोनू निगमने या प्रकरणावर आणखी बरीच वक्तव्य केली आहेत.
आपला हा व्हिडिओ शेअर करताना सोनू निगमने म्हटले की, 'असे दोन गायक आहेत ज्यांनी जगभरातील गायकांना प्रेरणा दिली आहे. पण, आपण एकाला केवळ पद्मश्रीपुरते मर्यादित ठेवले आहे, ते म्हणजे मोहम्मद रफी साहेब आणि दुसऱ्याच्या नशिबी तर पद्मश्रीही आला नाही, ते म्हणजे किशोर कुमार जी. काही लोकांना मरणोत्तर पुरस्कार देखील दिले जातात.'
सोनू निगम पुढे म्हणाला की, ‘अलका याज्ञिक यांची कारकीर्द खूप मोठी आणि दमदार आहे. मात्र, त्यांना आजतागायत सन्मान मिळालेला नाही. श्रेया घोषालही अनेक वर्षांपासून आपले कौशल्य सिद्ध करत आहे. पण तिलाही कोणता पुरस्कार मिळालेला नाही, सुनिधी चौहान जिने आपल्या वेगळ्या आवाजाने संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. त्यांनाही आजवर कोणताही सरकारी सन्मान मिळालेला नाही. आणि अशी किती नावे आहेत, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो, अभिनय असो की विज्ञान असो, ज्यांना न्याय मिळाला नाही, तुम्हाला काय वाटते?’
गायक सोनू निगमला २०२२मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सोनू निगमचे नाव आज बॉलिवूडच्या आघाडीच्या टॉप गायकांमध्ये येते, ज्यांनी १००००हून अधिक गाणी गायली आहेत. त्याने कन्नड, बंगाली, गुजराती, तमिळ, मराठी आणि इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आता सोनू निगमने या पुरस्काराबाबत आपले मत व्यक्त केले आहे. आता येत्या काही वर्षांत या गायकांना हा मान मिळतो की, नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या