Real Estate News : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं मुंबईतील वांद्रे परिसरातील आपला फ्लॅट २२.५० कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांच्या आधारे ‘स्क्वेअरयार्ड’नं ही माहिती दिली आहे. या व्यवहारात तिला तब्बल ८.५० कोटींचा फायदा झाला आहे.
सोनाक्षी सिन्हानं मार्च २०२० मध्ये हा फ्लॅट १४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. तेव्हापासून जवळपास ५ वर्षांत या फ्लॅटच्या किंमतीती ६१ टक्के वाढ झाली आहे.
सोनाक्षीनं विकलेला हा फ्लॅट वांद्रे पश्चिम इथल्या '८१ ऑरिएट'च्या १६ व्या मजल्यावर आहे. स्क्वेअरयार्ड्सनं दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीकडं याच ठिकाणी आणखी एक फ्लॅट आहे. ४.४८ एकरमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. कागदपत्रांनुसार, सोनाक्षी हिनं विकलेल्या फ्लॅटचा कार्पेट एरिया ४,२११ चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया ४,६३२ स्क्वेअर फूट आहे.
३१ जानेवारी २०२५ रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली असून १ कोटी ३५ लाख रुपये मुद्रांक शुल्क व ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे. सोनाक्षी सिन्हानं हा फ्लॅट दिल्लीतील रिची बन्सल नावाच्या व्यक्तीला विकला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि खरेदीदाराशी संपर्क होऊ शकला नाही.
स्क्वेअरयार्डच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ‘८१ ऑरिएट’कडं ७६ कोटी रुपयांच्या एकूण व्यवहार मूल्याचे आठ व्यवहार नोंदवले गेले. प्रकल्पातील ४ बीएचकेसाठी सरासरी पुनर्विक्री मालमत्तेची किंमत ५१,६३६ रुपये प्रति चौरस फूट आहे, तर सरासरी मासिक भाडे ८.५ लाख रुपये आहे.
गेल्या महिन्याभरात प्रॉपर्टी विकणारी सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील चौथी व्यक्ती ठरली आहे. जानेवारी २०२५ मध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी मिळून सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता विकली होती.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून (BKC) वांद्रे जवळच असल्यानं कॉर्पोरेट अधिकारी आणि उद्योजकांना प्रवासासाठी कमीत कमी वेळ घेणारा हा एक आकर्षक निवासी पर्याय आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटीचा या परिसराला मोठा फायदा झाला आहे.
बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनीही या परिसरात मालमत्ता खरेदी केली आहे.
सोनाक्षी सिन्हानं २०१० मध्ये सलमान खानसोबत 'दबंग' या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. गेल्या काही वर्षांत तिनं लुटेरा, अकीरा आणि मिशन मंगल सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. २०२४ मध्ये सोनाक्षी सिन्हा हिनं संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या चित्रपटात दरबारी आई आणि मुलगी अशी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. सोनाक्षीनं 'सोईझी' नावाचा स्वत:चा ब्युटी ब्रँडही नावारुपाला आणला आहे.
संबंधित बातम्या